अजित मांडके, ठाणे : कळवा येथील आनंद नगर भागात असलेल्या एकविरा संकुल चाळीवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. ही भिंती येथील सहा घरांवर पडली असूून त्यामुळे येथील रहिवाशांच्या घरातील वस्तुंचे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवतीहानी झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शुक्रवारी दुपारच्या सुमारास एकविरा संकुल चाळ येथील सहा घरांवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडली. यावेळी घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व इतर पथक घटनास्थळी दाखल झाले. ही भिंत अंदाजे ८० फुट लांब व २० फुट उंच असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच यावेळी एक झाडही त्यामुळे पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेत राघव जेना, मिनाक्षी कदम, वासुदेव साळवी, ललितकुमार खोत, संगिता पाटील आणि जयवंत माळी यांच्या घरावर ही भिंत पडली. यात घराच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर एक वृक्षही पडल्याने ते हटविण्याचे कामही यावेळी करण्यात आले.