अजित मांडके / ठाणेठाणे महापालिका निवडणुकीतील वाढीव सहा टक्के मतदान भाजपाच्या पथ्यावर पडेल, ही अपेक्षा फोल ठरली असून उलटपक्षी हे वाढलेले मतदान शिवसेनेला लाभदायक ठरल्याचे चित्र दिसत आहे. जुन्या ठाण्यात किंबहुना नौपाड्यातही शिवसेनेचा बुरूज ढासळला असला, तरी ज्या घोडबंदर रोड परिसरात मतदानाचा टक्का वाढला. तेथील केवळ एक प्रभाग वगळता शिवसेनेने बाजी मारली. वागळे आणि किसननगर पट्ट्यातही शिवसेनेला यश मिळाले. याशिवाय, दिव्यात मतदान वाढले होते. हे मतदान जो घेईल, त्याला लाभ होणार, हे स्पष्ट दिसत होते. दिव्यातील आठ जागांवर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. कोपरीच्या काही भागांत मतदान वाढले होते. तेथे मात्र शिवसेना व भाजपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नौपाड्यातील ४ आणि जुन्या जांभळी, टेंभीनाका परिसरातील २ जागा आणि वृंदावन भागातही ४ जागा भाजपाला मिळाल्या. या ठिकाणी कृष्णा पाटील यांचे जाणे शिवसेनेचे पराभवाचे कारण ठरले. तर, नौपाड्यातील आणि मध्यवर्ती ठाण्यातील पराभव हा जिव्हारी लागणारा ठरला. तर, घोडबंदर भागातील नव्याने निर्माण झालेल्या उच्चभ्रू वस्तीतील केवळ प्रभाग क्रमांक-२ पुरतीच भाजपाला पसंती दिसून आली. उर्वरित प्रभाग क्रमांक १ आणि ३ मध्ये शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. आमदार सुभाष भोईर यांचा मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे हिरा पाटील यांनी पराभव केला होता. असे असताना आणि इतरांचा विरोध असतानादेखील त्यांनी आपल्या मुलाला येथे उतरवले आणि त्याचे परिणाम शिवसेनेला भोगावे लागले. किसननगर, श्रीनगर भागातही शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. या काही जमेच्या बाजू असल्या तरी काही ठिकाणी शिवसेनेची गणिते चुकल्याचे दिसून आले. असे असले तरी विखुरलेल्या सर्व गटांना ऐन निवडणुकीत एकत्रित आणून आपली शक्ती दाखवल्यानेच शिवसेनेला हे स्पष्ट बहुमत मिळाले, असेच म्हणावे लागणार आहे. मागील वेळेस तुलनेत भाजपाच्या जागा अडीच पटीने वाढल्या.
वाढीव सहा टक्क्यांचा सेनेला लाभ?
By admin | Published: February 24, 2017 7:48 AM