लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोनामुळे आईवडील वा दोघांपैकी एका पालकाचा मृत्यू झाला आहे असे सात हजार ४४५ परिवार आहेत. या परिवारातील १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या अनाथ बालकांची शोधाशोध जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर सुरू आहे. आतापर्यंत अवघी एक हजार ३४ बालके शोधण्यात आली आहेत. उर्वरित सहा हजार ४११ बालकांचा शोध जिल्हा बालसंरक्षण समितीकडून सुरू आहे.
आतापर्यंतच्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील सात हजार ४४५ आई वा वडील कोरोनाने दगावले असे बालक आहेत. यापैकी ठाणे शहर व तालुक्यात दोन हजार ६०४ जण दगावले आहेत. कल्याण-डोंबिवलीतील एक हजार १७७, उल्हासनगरमधील ३७०, भिवंडीतील ५३९, शहापूर तालुक्यातील ७९, अंबरनाथमधील ४७१, मुरबाड तालुक्याचे ६४, मीरा-भाईंदरमधील १४ आणि नवी मुंबईतील १०८ आई आणि वडील दगावले आहेत. या परिवारातील बालकांचा शोध घेऊन त्यांच्या पुढील संगोपनाचे नियोजन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. यानुसार आतापर्यंत मयतांच्या पत्त्यांवर एक हजार ३४ बालके आढळली आहेत. उर्वरित बालके मयतांच्या पत्त्यावर नाहीत. त्यामुळे त्यांच्या मूळगावाचा शोध घेऊन त्यांची माहिती संकलित करून पुनर्वसनाची कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे, असे ठाणे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक रामकृष्ण रेड्डी यांनी लोकमतला सांगितले.
समुपदेशन करून पुनर्वसन
या मयत कुटुंबांच्या सर्वेक्षणात शोध घेतलेल्या बालकांचे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह कायदेशीर सेवा देऊन त्यांचे समुपदेशन करून पुनर्वसन करण्यात येत आहे. या बालकांची काळजी आणि संरक्षण अंतर्गत जिल्ह्यातील टास्क फोर्सच्या सदस्यांनी सुचविलेल्या बालकांच्या संबंधित विविध योजना आणि त्यानुसार कार्यवाही जिल्हा कृती दलातील सदस्यांकडून सुरू आहे.
----------