मीरारोड - भाईंदरच्या उत्तन चौक भागातील एका बंगल्यात, पर्यटनासाठी आलेल्या ६ वर्षाच्या चिमुरडीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आयसीसीआय बँकेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सह कुटुंब एक ग्रुप चौकच्या डोंगरावरील खाजगी बंगल्यात शुक्रवारी पर्यटनासाठी आला होता. यातील दहिसरचे नाडकर्णी कुटुंब हे सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी बंगल्यात गेले होते. त्यांची सहा वर्षांची दोन जुळी मुलं ही स्विमिंग पूल जवळ गेले असता मुलगी गीतिका स्विमिंग पुलच्या पाण्यात पडली आणि बुडाली. यानंतर, तिचा भाऊ आरडाओरड करत असताना, पहिल्या मजल्यावर असलेल्या एका ग्रुपमधील महिलेने पाहिले. यानंतर सर्वांनी स्विमिंग पूल जवळ धाव घेऊन गीतिका हिला बाहेर काढले. नजीकच्या रुग्णालयात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले.
या प्रकरणी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले, की परिसरात दुर्दैवी घटना घडली असून सहा वर्षाच्या चिमुकलीचा स्विमिंग पुलमध्ये पडून मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून उत्तन पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.