कल्याण : इतिहासात प्रथमच नवरा-नवरी हा उंच सुळका सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर साहसी गिर्यारोहण संस्थेने झिप्लायनिंगने सर केला आहे. या आव्हानात्मक मोहिमेत केवळ सहा वर्षे वय असलेल्या ग्रिहिता विचारे ही सहभागी झाली होती. तिनेही झिप्लायनिंग करून सुळका सर केला.
सह्याद्रीच्या पर्वतरांगात असंख्य उंच सुळके आहेत. त्यात प्रमुख नवरा-नवरीचा उंच सुळका त्र्यंबकेश्वर गावातील पहिने हद्दीतील लक्ष्मणपाडा या वाडीच्या बाजूला पाहावयास मिळतो. नवरा सुळक्याची उंची २६० फूट, तर नवरी सुळक्याची उंची २८० फूट उंच आहे. या दोन्ही सुळक्यांच्या बाजूला श्री हनुमान यांचे जन्मस्थान असलेल्या अंजनी पर्वत, भंडारदुर्ग, भास्करगड असे पर्वत आहेत.
ग्रिहिता हिने नऊवारी साडी नेसूनच दोन हजार उंच फुटांवरून झिप्लायनिंग केले. सकाळी सहा वाजता मोहिमेला लक्ष्मणपाडा येथून सुरुवात केल्यावर एक तासातच सुळक्याचा पाया गाठला. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरने चढाईचे साहित्य ग्रिहिताला लावून दिले होते. त्यात कंबरेला बांधलेले हर्णेस, डोक्यावरील हेल्मेट, झुमर आदी साहित्य तपासले. तेथे एक दिवस आधीच झिप्लायनिंगचा सेटअप लावला होता. या चढाईने कल्याणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ग्रिहिताला रॉक ॲडव्हेंचरचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, कल्पेश बनोटे, राजेश गायकर, अक्षय जमदरे, प्रदीप घरत, सुनील खणसे, रसिका येवले, विकी बुरकुले, महेंद्र पांडे, भावेश सकपाळ, ऋषिकेश बापर्डेकर, विश्वनाथ सुर्वे आणि स्वप्निल भोईर यांनी सहकार्य करून ही मोहीम फत्ते केली.
पोलीस पाटील यांनी केला सत्कार
पहिने गावाच्या पोलीस पाटील यांनी ही मोहीम सर करणाऱ्यांचा सत्कार केला, तसेच यापुढे चढाई केल्यावर या दोन्ही सुळक्यांवर महाराष्ट्र राज्याची ओळख असलेला भगवा ध्वज लावून द्यावा, अशी ॲडव्हेंचर ग्रुपला विनंती केली.