ठाणे-१ मे २००२ रोजी ठाणे नगरीचा पहिला कोळी महोत्सव कस्टम जेटीवर कै सुभाष बाळकृष्ण कोळी यांच्या पुढाकाराने व गावकीच्या सहकार्याने संपन्न झाला.तीच परंपरा त्यांच्या पश्चात चिरंजीव विक्रांत कोळी यांनी कायम राखीत १६ वा कोळी महोत्सव चेंदणी कोळीवाडासांस्कृतिक कला मंच , ठाणे यांचा विद्यमाने व एल.आय. सी - जी.पी.पारसिक सहकारी बँक मर्यादित यांच्या संयुक्त सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रारंभी धी युनाइटेड स्पोर्ट्स क्लबचे जेष्ठ सदस्य उमाकांत नाखवा, रेखा नाखवा तसेच जेष्ठ नागरिक वासुदेव तरे,चंद्राबाई नाखवा,भागीरथी कोळी, श्रीमती पार्वती कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यांत आले. सोबत चित्रकार महेश कोळी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मंचच्या बोध चिन्हाचा व चेंदणी कोळीवाडा गावठाण संवर्धन समितीने अभ्यासपूर्वक साकारलेल्या "मीठबंदरावरच्या तोफा" या छोटेखानी पुस्तिकेचा अनावरण समारंभही या प्रसंगी पार पडला.हे पुस्तिका हातोहात विकली गेली.धवकरीनपुष्पलता ठाणेकर,जेष्ठ समाजसेवक सुरेश कोळी,मानवेंद्र ठाणेकर,डॉक्टर अश्लेषा कोळी,आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बाल कराटेपटू आराध्य नाखवा, बाल ,जलतरणपटू ध्रुव कोळी व लष्कर मोरे,आंतरराष्ट्रीय कीर्तीची लोक व लावणी नृत्यांगना प्रज्ञा कोळी - भगत, ठाणे शहर पोलीस दलातील प्रशासकीय अधिकारी रागिणी ठाणेकर व श्री आनंद भारती समाज संस्थेचा क्रियाशील महिला कार्यकर्त्या माधुरी कोळी यांचा कै शांताराम हिरा कोळी (समस्त त्रिमूर्ती परिवार) स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माधुरी कोळी हिने सत्कारास उत्तर दिले.यंदा प्रथमच ड्रोनच्या मदतीने फोटोग्राफी करण्यांत आली तर भरत वामन कोळी यांची "पारंपरिक कोळी बोली भाषेतील शब्द ओळखा" या अनोख्या स्पर्धेनेही रंगत आणली.कोळी लोकगीते,कोळी नृत्ये , पारंपरिक वेशातील शोभा यात्रा व कोळी पद्धतीचे खाद्य स्टॉल हा बाज कायम राखला गेला. ठाण्यातील सामाजिक,राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी महोत्सवास सदिच्छा भेट दिली. त्यात ठाण्याचे सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांचाही समावेश होता.