ठाणे: कर्ज काढून देण्याच्या नावाखाली एका भामटयाने ठाण्याच्या श्रीरंग सोसायटीमधील एका महिलेच्या बँक खात्यातून ६१ हजार ५६० रुपये लुबाडल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात या महिलेने ११ मार्च रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.श्रीरंग सोसायटीत राहणारी ही ३३ वर्षीय महिला आणि तिच्या पतीला कर्जाची गरज होती. त्यासाठीया दाम्पत्याने संकेतस्थळाच्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या एका नामांकित कंपनीचा क्रमांक शोधला. पुण्याच्या वाकडेवाडी येथील अर्थ पुरवठा करणा-या या खासगी कंपनीतील राहुल शर्मा नावाच्या व्यक्तीचा त्यांना मोबाईल क्रमांक मिळाला. या क्रमांकावर या महिलेने फोन केला असता, शर्मा याने आपण बजाज कंपनीकडून बोलत असल्याचा दावा केला. या कंपनीकडून आपण कर्ज मिळवून देत असल्याची बतावणीही त्याने केली. त्यांनतर त्याने या महिलेच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करुन ती उघडण्यास त्याने सांगितले. आपल्याला मोठया रकमेचे कर्ज मिळेल, या आशेने या महिलेने ती लिंक क्लिक करुन पाहिली. त्यांनतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून युपीआय आणि पेटीएमद्वारे ६१ हजार ५६० रुपयांची रोकड १ मार्च २०१९ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास लंपास करण्यात आली. या प्रकारानंतर त्यांनी शर्मा यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो नॉट रिचेबल मिळाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ११ मार्च रोजी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक घाडगे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
ठाण्यात कर्ज देण्याच्या नावाखाली ६१ हजार रुपये लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 9:54 PM
इंटरनेटच्या माध्यमातून एका नामांकित वित्तसंस्थेचा मोबाईल क्रमांक शोधणाऱ्या दाम्पत्याला ६१ हजारांचा फटका बसला आहे. संबंधित मोबाईल क्रमांकावरील व्यक्तीने कर्ज देण्याच्या नावाखाली बँक खात्याशी संबंधित माहिती घेऊन फसवणूक केल्याची घटना ठाण्याच्या राबाडी भागात घडली.
ठळक मुद्देसंकेतस्थळावरुन मिळाला बनावट मोबाईल क्रमांकवित्तसंस्थेचा प्रतिनिधी असल्याची केली बतावणीकोणालाही फोनवरुन माहिती न देण्याचे पोलिसांचे आवाहन