ठाणे : ठाण्यात क्लस्टरच्या विरोधाची धार आणखी वाढली आहे. काँग्रेसने सुरुवातीला याला विरोध केल्यानंतर रहिवाशांनीदेखील हजारो हरकती पालिकेकडे नोंदवल्या आहेत. तसेच संपूर्ण शहरात होर्डिंग्ज लावून काँगे्रसने विरोध केला आहे. त्यानंतर, आता राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून ठाणे शहरातील क्लस्टर योजनेमधून कोळी-आगरी गावठाणांना वगळून मुंबईच्या धर्तीवर त्यांना विशेष सवलती देण्याची मागणी केली आहे.मागील काही दिवसांपासून क्लस्टरविरोधात वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने क्लस्टरचा झोल निदर्शनास आणल्यानंतर रहिवाशांनीदेखील क्लस्टरमधून गावठाण आणि कोळीवाड्यांना वगळावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर, शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांनी पक्षाला घरचा आहेर देत, या योजनेला विरोध दर्शवला. तर, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीदेखील या योजनेची अधिसूचना रद्द करून ती नव्याने काढून महासभेसमोर आणून मगच पुढील धोरण ठरवण्याची मागणी केली. तर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील क्लस्टरमध्ये असलेले दोष हरकतींच्या माध्यमातून समोर आणले आहेत. त्यानंतर, आता राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यात उडी घेतली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र यांना दिलेल्या निवेदनानुसार राज्य शासनाने ५ जुलै २०१७ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून ठामपा क्षेत्रासाठी क्लस्टर योजना जाहीर केली आहे. त्यानुसार, ठामपाने २७ एप्रिल २०१८ रोजीच्या अधिसूचना व आराखड्यात गावठाण जमिनींचाही समावेश समूह विकास योजनेत केला आहे. मात्र, ठाणे शहरातील जी कोळी-आगरी गावठाणे आहेत, त्यांचे नव्याने महसुली सीमांकन करून त्यांना क्लस्टरमधून वगळून मुंबईमधील आगरी-कोळी वस्त्यांना ज्या सवलती दिल्या आहेत, त्याच धर्तीवर ठाण्यातील आगरी-कोळी गावांनाही सवलती देण्यात याव्यात. शिवाय, मुंबई विकास प्राधिकरणामधील सर्वच आगरी-कोळी गावठाणांना सरसकट एकच सुविधा प्रदान कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.
क्लस्टर योजनेतून गावठाणे वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:08 AM