- पंकज रोडेकर
ठाणे : जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात आणखी एका गोष्टीची लवकरच नोंद होणार आहे. प्रशासकीय कामकाज एकाच छत्राखाली आणि तेही तब्बल तळ अधिक १० मजली इमारतीत होणार आहे. या गगनचुंबी इमारतीमुळे ठाणे जिल्हा न्यायालयाला नवीनच झळाळी मिळणार आहे. एकूण ९४ कोटी खर्चाच्या इमारतीचे बांधकाम येत्या जानेवारी २०१९ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून भविष्यातील २५ वर्षांच्या वाढीव कोर्टांचाही यात विचार केला आहे. साधारणत: २०२१ मध्ये येथून न्यायदानाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्हा न्यायालयाचे एकू ण क्षेत्रफळ १६,४३५.६० चौ.मी. आहे. त्यामध्ये सद्य:स्थितीत १९६८-६९ मध्ये बांधकाम केलेल्या इमारतीत जिल्हा न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. तिच्या मागील बाजूस असलेल्या बंद अवस्थेत जुने कोर्ट नंबर १, २, जुन्या बार रूम आणि सध्या सुरू असलेले कॅन्टीन आदी असलेल्या जागी तळ अधिक १० मजली गगनचुंबी इमारत बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता २०१६ साली मिळाली आहे. करण्यात येणारे बांधकाम साधारणत: १२४५ चौ. मीटरचे असून ही इमारत ‘सी’ आकाराची उभी राहणार आहे. तसेच या बांधकामासाठी ४६ कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. या कामाबाबतची वर्कआॅर्डर काढण्यात आल्यावर हे काम तत्काळ सुरू होईल. सुमारे २०१९ च्या जानेवारी महिन्यात याचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या जून महिन्यापूर्वी इमारतीचे जमिनीखालील बांधकाम पूर्ण करण्याचा मानस सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. तसेच ही इमारत दोन वर्षांत पूर्ण होईल, असा विश्वास सूत्रांनी वर्तवला आहे.