वाडा : तालुक्यातील तानसा फाॅर्म (मेट) येथे असलेल्या औषधे बनवणाऱ्या पेलटेक हेल्थ या कंपनीत दुपारच्या सुमारास इमारतीचा स्लॅब भरत असताना स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खुपरी येथील कल्याणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. कमल मंगल खंदारे (वय ४७) आणि लाल (वय ३०) हे दोन कामगार मृत्युमुखी पडले असून ब्रिजेश पटेल, राकेश कुमार, विजय सिंग, गोरख कुमार व अनिल कुमार अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील तानसा फाॅर्म (मेट) या गावाच्या हद्दीत पेलटेक हेल्थ ही कंपनी असून या कंपनीत औषधांचे उत्पादन केले जाते. या कंपनीतील एका शेडमध्ये बांधकाम करण्याचे काम सुरू होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. अचानक स्लॅब कोसळून कामगारांच्या अंगावर पडला. यात कमल व लाल या कामगारांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर खुपरी येथील कल्याणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असून मयत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे नेते जितेश पाटील यांनी केली आहे.