अंबरनाथ : अंबरनाथच्या पश्चिम भागातील साउथ इंडियन शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या एका जुन्या इमारतीचा स्लॅब गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. सकाळी ७ वाजता याच इमारतीजवळ विद्यार्थ्यांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे या अपघातातून विद्यार्थी थोडक्यात बचावले. या घटनेनंतर पालिका प्रशासनाने इमारतींच्या मालकांना चौकशीसाठी बोलावून त्यांना ही इमारत तत्काळ तोडण्यास सांगितले आहे.साउथ इंडियन शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच १० फुटांच्या अंतरावर ही इमारत आहे. या इमारतीमध्ये कुणीच राहत नसले, तरी या इमारतीच्या तळमजल्यावर चर्च आहे. या चर्चमध्ये नेहमी नागरिकांची वर्दळ असते. रविवारी या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी नागरिक येतात. ही इमारत पालिकेच्या धोकादायक इमारतीच्या यादीत नसली, तरी ही इमारत पडायला आली आहे. ही इमारत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात २८ डिसेंबर २०१६ रोजीनगरसेवक प्रदीप पाटील यांनी पालिकेला एका पत्राद्वारे या इमारतीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पालिकेने या इमारतीला केवळ नोटीस पाठवण्याव्यतिरिक्त कोणतीच कारवाई केली नाही. या ठिकाणी चर्च भरत असल्याने या ठिकाणी प्रार्थनेसाठी येणाऱ्या ख्रिस्तीबांधवांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. त्यातच, गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता या इमारतीचा एक भाग कोसळला. विद्यार्थी आणि त्यांना सोडायला येणारे पालक याच इमारतीखाली उभे राहतात. पालिका प्रशासनाने इमारतीच्या मालकांना बोलावून इमारत तत्काळ पाडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या इमारतीचा वापर न करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
अंबरनाथमध्ये स्लॅब कोसळला
By admin | Published: February 17, 2017 2:02 AM