- सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं- 3 गुरुद्वार परिसरातील मेमसाहेब इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कोसळून तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून इमारत खाली करण्यात आली आहे.
उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारतीचा स्लॅब कोसळून अनेक जणांचे बळी गेले आहेत. हिराघाट गुरुद्वारा जवळील पाच मजल्याची मेमसाहेब इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या व तळमजल्याच्या क्लिनिकवर कोसळून एकच हाहाकार उडाला. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्लॅब खाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. नितु साजिदा (60), अर्पिता मोर्या (25), प्रिया मोर्या (2) अश्या तिघांचा मृत्यू झाला. साई आशीर्वाद क्लिनिकचे डॉ. रिजवानी यांच्यासह दोन जण जखमी झाले असून जखमींची आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी स्लॅब खाली अडकलेल्याना त्वरित बाहेर काढले. सुरक्षेचा उपाय म्हणून मेमसाहेब इमारत खाली करून फ्लॅटधारकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. आहे. इमारत पाच मजल्याची असून इमारतीत एकूण 15 फ्लॅट व 5 दुकाने आहेत. स्लॅब कोसळला त्यावेळी साई आशीर्वाद क्लिनिक सुरू होते.