उल्हासनगर : कॅम्प नं-४, २९ सेक्शन परिसरातील धोकादायक मंगलमूर्ती या रिकामी इमारतीच्या स्लॅबचा काही भाग रस्त्यावर कोसळल्याने, एक महिला किरकोळ जखमीं झाली. स्थानिक नागरिकांनी व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी इमारत जमीनदोस्त करण्याची मागणी महापालिकेकडे केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ परिसरात मंगलमूर्ती नावाची पाच मजली इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्यावर, इमारत गेल्या ७ वर्षांपूर्वी खाली करण्यात आली असून इमारत जर्जर अवस्थेत उभी आहे. धोकादायक मंगलमूर्ती इमारत केंव्हाही पडून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यानंतरही इमारतीवर महापालिकेने पाडकाम कारवाई केली नाही. गुरवारी दुपारी इमारतीच्या वरच्या मजल्याचा बाहेरील स्लॅब रस्त्यावर कोसळल्याने, इमारती खालून जात असलेली एक महिला सुदैवाने किरकोळ जखमी झाली.
महापालिका अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली असून स्थानिक नागरिकांना सतर्क करण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी महापालिका लवकरच इमारती बाबत निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले.