सदानंद नाईक
उल्हासनगर - उल्हासनगरमधील कॅम्प नं - 1 येथील सचदेव कॉम्प्लेक्स इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (20 ऑगस्ट) रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. सुदैवाने तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर कोणी राहत नसल्याने जीवितहानी झालेली नाही. शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने इमारतधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगरमध्ये इमारत कोसळण्याचे व स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असल्याने जुन्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एका महिन्यात 12 पेक्षा जास्त इमारती महापालिकेने खाली केल्याने शेकडो कुटुंब बेघर झाले. त्यांच्यावर घर देता का घर म्हणण्याची वेळ आली. मंगळवारच्या महासभेत धोकादायक इमारतीवर चर्चा होऊन कोसळलेल्या व धोकादायक झालेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-1 येथील 3 मजल्याच्या सचदेव कॉम्प्लेक्स इमारती मधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडल्याने इमारती मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन इमारती मधील 5 कुटुंबाना सुरक्षित बाहेर काढले. आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांच्यासह इतर पक्षाच्या नेत्यांनी इमारतीला भेट देऊन कुटुंबाची विचारपूस केली. गेल्या मंगळवारी 5 मजल्याची महेक इमारत पत्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली. इमारत कोसळण्याच्या आदल्या दिवसी इमारत खाली केल्या 31 कुटुंबातील 150 जणांचा जीव वाचला. इमारती मधील स्लॅब कोसळण्याच्या सत्राने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगरमधील महेक इमारत याआधी मंगळवारी (13 ऑगस्ट) कोसळल्याची घटना समोर आली होती. खचलेल्या महेक इमारतीमधून सोमवारी 31 कुटुंबाना बाहेर काढण्यात आले होते. ही इमारत सीलबंद केल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. इमारत कोसळल्याने काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणत प्लॉटधारकांनी परमेश्वरांसह पालिका अधिकाऱ्याचे आभार मानले होते. महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सविस्तर माहिती घेऊन, इमारतीचा अहवाल येई पर्यंत इमारत सीलबंद करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक आयुक्त भगवान कुमावत यांनी इतरांची मागणी न ऐकता इमारत सीलबंद करून इमारतीमध्ये जाण्यास लोकांना मज्जाव केला होता. महापालिका आयुक्त देशमुख व सहाय्यक आयुक्त कुमावत यांचा निर्णय अखेर योग्य ठरून 31 कुटुंबांचा जीव वाचला.