उल्हासनगर : कॅम्प नं-२, नेहरू चौक, बडोदा बँकेसमोरील साईशक्ती या ५ मजली इमारतीचा स्लॅब शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता तळमजल्यावर कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला तर १ जण जखमी झाला. इमारतीचे स्लॅब कोसळून १५ दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीपर्यंत संबंधित इमारतीच्या स्लॅबचा ढिगारा उचलण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यू झालेल्यांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केले. (Slabs collapse continues in Ulhasnagar, 12 killed in 15 days)
उल्हासनगरात सन १९९२ ते ९६ दरम्यान रेती बंद असल्याने, बहुतांश बांधकामे वालवा रेती व दगडाच्या बारीक चुऱ्यातून झाले. याच दरम्यान बांधण्यात आलेल्या बहुतांश इमारतीचे स्लॅब कोसळून बळी जात आहेत. गेल्या १० वर्षात ३३ इमारतीचे स्लॅब कोसळून ४२ पेक्षा जास्त जणांचा बळी गेले. कॅम्प नं-२ मधील साईशक्ती इमारतीचा पाचवा मजल्याचा स्लॅब शुक्रवारी रात्री तळमजल्यावर पडला. यात ७ जण दबल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांना सांगण्यात आली. रात्री उशीरा पर्यंत अग्निशमन जवानांनी ढिगाऱ्या खालून ५ मृतदेह काढल्या नंतर त्यांच्या मदतीला ठाणे टीडीआरएफ टीम धावली. या ढिगाऱ्याखालून एकून ७ मृतदेह काढण्यात आले तर एक जण जखमी झाला. इमारतीत अथवा ढिगाऱ्या खाली कोणीही व्यक्ती नसल्याची खात्री झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन मध्यरात्री संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी यांनी इमारत सील केली. यावेळी घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार कुमार आयलानी,आयुक्त डॉ. राजा दयानिधी आदी उपस्थित होते.
जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याचे नाव अलगोत नायडर (६०) असे आहे. तर मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव पुनीत बजोमल चांदवाणी (१७), दिनेश बजोमल चांदवाणी (३५), दीपक बजोमल चांदवाणी- (४२), मोहिनी बजोमल चांदवाणी (६५), कृष्णा इनूचंद बजाज (२४), अमृता मूलचंद बजाज (४६) व लवली बजाज (२१) अशी आहेत. चांदवानी कुटुंब इमारतीच्या पाचव्या मजल्यावर तर बजाज कुटुंब पहिल्या मजल्यावर राहत होते. प्लॉट नं-३०४ व ४०४ खाली होते तर २०२ प्लॉटमधील नागरिक बेडरूममध्ये असल्याची महिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलून शहरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत बोलून सकारात्मक निर्णय आणण्याचे आश्वासन दिले.
इमारतीमधील १५ कुटुंब थारासिंग दरबारातसाईशक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जण मृत्यू पावल्याने, इमारत रात्री सील केली. एकून २९ प्लॉट पैकी अर्धेअधिक प्लॉट रिकामे असून इतर कुटुंबांना थारासिंग दरबारमध्ये राहण्याची व्यवस्था केली. इमारतीमध्ये अडकलेल्या दागिन्यासह संसार उपयोगी साहित्य काढण्यास बेघर कुटुंबांना आज परवानगी दिली.