ठाणे : उरणमध्ये तीन संशयितांनी पोलिसांसह सर्वांची झोप उडवली असताना शुक्रवारी मध्यरात्री एका ओला टॅक्सीचालकाने दिलेल्या पाच संशयितांच्या माहितीने ठाणे पोलिसांचीही चांगलीच झोप उडाली. मात्र, ते संशयित पाच मद्यपी असल्याचे उघड झाले. त्यापैकी एकाची पत्नी सिव्हील रुग्णालयात दाखल असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्या पाच जणांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक ओला टॅक्सी ठाणे सिव्हील रुग्णालयाजवळ धडकली. या वेळी त्या टॅक्सीतून दाढीमिशा वाढलेले पाच जण उतरले. तसेच प्रवासात त्या पाच जणांच्या बोलण्यातून संशयाची पाल त्या टॅक्सीचालकाच्या मनात चुकचुकली. तत्पूर्वीच उरण येथे काही संशयित आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली होती. याचदरम्यान, त्या टॅक्सीचालकाने खबरदारी म्हणून ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत त्या पाच जणांच्या वेशभूषा, बोलणे यांची माहिती पोलिसांना दिली. त्या वेळी साधारणत: दीड ते पावणेदोन वाजले होते. तातडीने पोलिसांचा फौजफाटा ठाणे सिव्हील रुग्णालयात दाखल झाला. याचदरम्यान, पोलिसांनी रुग्णालय पिंजून काढला. तसेच आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी केली. तसेच रेल्वे स्थानकातही कसून तपास केला. मात्र, काही हाती लागले नाही. मात्र, ते पाच जण मुंबई, भांडुपमधून आल्याचे उघडकीस समोर आल्यावर त्या पाच जणांची ओळख पुढे आली. त्यांची चौकशी केल्यावर ते दारूच्या नशेत तर्र झाल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यातील जितेंद्रच्या पत्नीला डेंग्यू झाल्याने तिला सिव्हील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. आता त्या पाच जणांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.टॅक्सीचालकाच्या माहितीने सतर्कता लक्षात घेऊन तत्काळ त्यांचा शोध घेतला. पण, तसेच काही नसल्याचे समोर आले. पण, अशा प्रकारे संशयितांची चर्चा करणाऱ्या त्या पाच जणांची चौकशी सुरू आहे.- अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर
मद्यपींनी उडवली पोलिसांची झोप
By admin | Published: September 25, 2016 4:32 AM