ठाणे : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असून पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दुष्काळाची ही भयानक परिस्थिती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी पाण्याची कथा स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आली. २०१३ सालच्या भीषण दुष्काळाच्या चित्रफितीने ठाणेकरांच्या डोळ्यांत पाणी आले. फोटो सर्कल सोसायटीच्या वतीने २०१० पासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा रविवारी ७५ वा शो पार पडला. या वेळी ‘पाणी दी स्टोरी आॅफ वॉटर’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. २०१३ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळग्रस्त भागांत जाऊन वरिष्ठ छायाचित्रकार संजय नाईक, प्रवीण देशपांडे यांनी दुष्काळाची भीषण दृश्ये आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. या वेळी भाजपाच्या अॅड. माधवी नाईकदेखील त्यांच्यासह होत्या. १० दिवसांत १० जिल्ह्यांचा प्रवास त्यांनी केला होता. सध्या महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ पाहता २०१३ सालचा दुष्काळाचा प्रवास स्लाइड शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला. २० मिनिटांत चार वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाचे चित्रण पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू होते. या स्लाइड शोमधल्या एका प्रसंगाने थक्क झाले, तो प्रसंग होता बुलडाणा जिल्ह्यातील देऊळराजा या गावातला. २९ दिवसांनी एकदा पाणी येते, तेही एक तास. टँकरचे पाणी आले की महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक कशा प्रकारे धावतात, या प्रसंगाने हेलावून टाकले. जी २०१३ साली परिस्थिती होती, ती आजही महाराष्ट्रात आहे. शहरांमध्येही दुष्काळाची झळ पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणी वाचवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हेच या वरिष्ठ छायाचित्रकारांनी सांगितले. या वेळी त्यांनी या प्रवासादरम्यान आलेले अनुभवकथन केले. या वेळी अॅड. नाईक यादेखील उपस्थित होत्या. आजही परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत जपून वापरवे व पाणी वाचवावे, असा संदेश त्यांनी दिला. काही ठिकाणी जलयुक्त शिवार योजनेतून सरकारने जी कामे केली, त्यातून परिस्थिती बदलली असल्याचेही सांगितले. (प्रतिनिधी)
टंचाईच्या ‘स्लाइड शो’ने डोळ्यांत पाणी
By admin | Published: April 20, 2016 2:02 AM