अजित मांडके - ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु, ऑनलाइन बुकिंगच्या वेळा निश्चित नसल्याने लसीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत. काहींनी आठवडा होऊ न गेला तरी स्लॉट मिळत नाहीत, तर काहींनी काही क्षणात स्लॉट उपलब्ध होत आहेत. काही ठिकाणी स्लॉट बुकिंगसाठी फळीच उभारण्यात आल्याने सर्वसामान्यांना बुकिंगचा स्लॉटच मिळत नाही. स्लॉट बुक करायला गेल्यावर सेंटरचा क्रमांक टाकून ते शोधण्याच्या काही सेंकदातच स्लॉट बुक होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.ठाण्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू झाले आहे. परंतु, आधीच लसींचा साठा अपुरा असल्याने प्रत्येक महापालिकेने आपल्या केंद्रांची संख्यादेखील कमी केली आहे. त्यातही ऑनलाइन बुकिंग केली जात असल्याने प्रत्येकाला स्लॉटमध्ये नंबर लागेल अशी शक्यता नाही. सुरुवातीला तर स्लॉट बुकिंगच्या वेळाच निश्चित नसल्याने गोंधळ होत होता. त्यामुळे दिवसभर तो ओपन होण्याची वाट पाहत अनेक जण मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत होते. मात्र, आता अनेक ठिकाणी स्लॉट बुकिंगच्या वेळा निश्चित केल्या आहेत. परंतु, त्या वेळा मागे पुढे होतांना दिसत आहेत. कधी तर सेंटरच दाखविले जात नाही, तर कधी ज्या वेळेत बुकिंग करणे गरजेचे आहे, त्यावेळेस स्लॉटच ओपन नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत.
ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांच्या ठिकाणी आता बुकिंगच्या वेळा निश्चित केल्या आहेत. परंतु, त्या वेळेच्या पाच मिनिटे आधी किंवा १० मिनिटे आधी जरी बुकिंगसाठी सज्ज झाले तरीदेखील ऐनवेळेस ओटीपीच येत नसल्याने अनेकांचा खोळंबा होत आहे. त्यातही बुकिंगपर्यंत पोहचले तरीदेखील अवघ्या दोनच मिनिटात स्लॉट फुल होत आहे. दोन मिनिटात ३०० जणांचे बुकिंग कसे फुल्ल होते, असा सवाल नागरिक करीत आहेत.ठाण्यात स्लॉट बुकिंगसाठी सकाळी ९ आणि सांयकाळी पाचची वेळ निश्चित केली आहे. परंतु यातही ज्यांचे नशीब असेल त्यांनाच क्रमांक यात लागत आहे. नाही तर अनेकांचा आठवडा होऊनही नंबर लागत नाही. कुठे ओटीपी मिळत नाही, तर कुठे स्लॉट दाखविला जात नाही, कुठे तो दिसत असला तरी बुकिंग टाकता क्षणी स्लॉट फुल्ल झाल्याचे दिसत आहे.ठाणे जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटातील तब्बल ४४ लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, आतापर्यंत ३० हजार ८९२जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या मानाने किंवा उद्दिष्टाच्या मानाने अवघे एक ते दोन टक्केच लसीकरण पूर्ण झाले आहे.
सकाळी ९ आणि सायंकाळी पाच वाजता राहा तयारठाण्यात सकाळी ९ आणि सांयकाळी पाच वाजता स्लॉट बुक करावा लागत आहे. त्यामुळे बुकिंगसाठी १० मिनिटे लॉगिन करून तयार राहा, असे आवाहन केले आहे. त्यानुसार नागरिक वेळेच्या आधीच लॉगिन करून बुकिंगसाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. आधी आरोग्य सेतू ॲपवर जाऊन मोबाइल क्रमांक टाकल्यावर तुम्हाला ओटीपी येतो, तो टाकल्यानंतर रजिस्ट्रेशन असलेल्यांची नावे सिलेक्ट करावी लागतात. त्यानंतर केंद्राचा पिन कोड टाकावा लागतो. त्यानंतर त्याठिकाणी बुकिंग उपलब्ध आहे किंवा त्याची यादी समोर येते. त्यानंतर ते कन्फर्म करावे लागते. यात १० ते २० सेकंदाचा निश्चितच कालावधी जातो. त्याच कालावधीत बुकिंग झाले, तर ठीक अन्यथा पुन्हा दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागत आहे.
मागील एक आठवड्यापासून लसीकरणचे स्लॉट बुक करण्यासाठी सकाळ आणि सांयकाळच्या सत्रत प्रयत्न करीत आहे. परंतु, लॉगिन करायला गेल्यावर ओटीपीच येत नाही, आणि जेव्हा ओटीपी मिळत आहे, तोपर्यंत स्लॉट फुल्ल होत आहे. - रुपेश जाधव, नागरिक
पालिकेच्या वेळात काहीसा सावळा गोंधळ दिसत आहे. स्लॉट बुकिंगची वेळ दिलेली आहे. परंतु त्यावेळेत स्लॉट बुक होत नाही, वेळा मागे पुढे होतांना दिसत आहे. त्यामुळे अद्यापही माझे स्लॉट बुकिंग होऊ शकलेले नाही. - संजय पाटील, नागरिक
एक आठवडा झाला सकाळी आणि संध्याकाळी सध्या स्लॉट बुकिंग कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, दोन मिनिटात स्लॉट बुक होत असल्याने नुसता मनस्ताप वाढला आहे. यावर तातडीने उपाययाेजना आवश्यक आहे. - संजना पगारे, महिला
महापालिकेच्या वतीने सकाळी ९ वाजता आणि सांयकाळी पाच वाजता बुकिंगचे स्लॉट ओपन होत आहेत, त्यानुसार ज्यांचे बुकिंग होत आहे, त्यांना दुसऱ्या दिवशी लस उपलब्ध करून दिली जात आहे. - संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा