मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटी प्रकल्पात २०१६ मध्ये समावेश झाला. २०१६ पासून आतापर्यंत केवळ सिटी पार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, कल्याण रेल्वेस्टेशन परिसराच्या विकासाची निविदा दुसऱ्यांदा मागवली आहे. त्यासाठी पाच कंत्राट कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. ही निविदा २५ जूनला उघडली जाणार आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटीचा एक हजार ४४५ कोटींचा प्रकल्प प्रस्ताव सादर केला होता. त्याला २०१६ मध्ये सरकारने मंजुरी दिली. स्मार्ट सिटीअंतर्गत एरिया बेस व पॅन सिटी या दोन प्रकारांत करण्यात येणाºया विकास प्रकल्पांपैकी केवळ सिटी पार्कच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिटी पार्कप्रमाणेच स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराचा विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी ३९५ कोटी खर्च केले जाणार आहेत. रेल्वेकडून त्याला नाहरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच रेल्वे व महापालिकेचा सामंजस्य करार झालेला आहे. महापालिकेने ३९५ कोटींची निविदा मागवली होती. तिला तीन बड्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र, कंपन्यांनी दिलेला देकार आणि प्रकल्पासाठी मंजूर असलेला निधी त्यानुसार ठरवलेल्या निविदेची रक्कम यांच्यात तफावत होती.
जवळपास ११८ कोटींची तफावत असल्याने जादा रकमेची निविदा एमएमआरडीएने मंजूर केली नाही. त्यामुळे महापालिकेने स्थापन केलेल्या कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी विकास कंपनीच्या वतीने दुसऱ्यांदा निविदा मागवली. ३९५ कोटींच्या विकासकामांच्या निविदेस पाच कंत्राट कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या निविदेच्या गतीला आचारसंहितेचा ब्रेक मिळाला होता. २३ मे रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यावर आता स्मार्ट सिटीच्या स्टेशन परिसर विकासाच्या निविदेला गती मिळाली आहे. महापालिकेसह स्मार्ट सिटी कंपनीसोबत निविदा भरणाºया कंत्राटदार कंपन्यांशी निविदापूर्व बैठकही पार पडली आहे. या बैठकीत निविदाधारक कंपन्यांच्या काही सूचना व गैरसोयींच्या बाजू ऐकून घेण्यात आल्या. त्यानंतर, कंपन्यांनी सादर केलेली कागदपत्रे तपासली जाणार आहेत. त्यापश्चात २५ जूनला निविदा उघडण्यात येतील. त्याला अंतिम मंजुरीसाठी कंपनीच्या सदस्य मंडळासह एमएमआरडीएच्या आयुक्तांकडे पाठवले जाईल. त्यानंतर, निविदा निश्चित केली जाईल. या प्रक्रियेत आणखीन दोन महिन्यांचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर, निविदा निश्चित झाली तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांकरिता लागणारा ३५० कोटींचा निधी महापालिकेला मिळाला आहे. प्रकल्पांच्या निविदा निश्चित करण्याचे काम सध्या सुरू असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.
सिटी पार्क या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १०० कोटींचा खर्च होणार असल्याने तो महापालिकेच्या निधीतून करणे शक्य नसल्याने त्याचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात केला आहे. सिटी पार्कच्या कामाचे भूमिपूजन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झाली नसल्याचा दावा स्थानिक भाजप नगरसेवक दया गायकवाड यांनी केला होता. मात्र, यासंदर्भात प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा यांनी प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्याठिकाणी मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच हा भराव पावसाळ्यात वाहून जाऊ नये, यासाठी प्रकल्पाच्या जागेभोवती संरक्षक भिंत बांधली जात आहेत. सिटी पार्कच्या पहिल्या टप्प्यातील ७२ कोटी खर्चाची निविदा मंजूर केली आहे. ंकंत्राटदाराला १९ मे २०१८ रोजी कार्यादेश दिला आहे. दुसºया टप्प्यात २८ कोटींचे काम केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामच वर्षभरापासून संथगतीने सुरू आहे.
पूरक प्रकल्पही कागदावरचकल्याण पश्चिमेला वाडेघर, उंबर्डे, सापाड या ठिकाणी विकास परियोजनेंतर्गत विकास केला जाणार आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर नियोजित विकास केला जाणार आहे. हा विकास सिटी पार्कला पूरक ठरणार असून कोरियन कंपनीशी सामंजस्य करार केला आहे. ही कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्याच्या विकास आराखड्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
महापालिकेच्या इरादापत्रासह त्याच्या मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे हे प्रस्ताव पाठवलेले आहेत. नगरविकास खात्याकडून अद्याप त्यावर काही उत्तर महापालिकेस मिळालेले नाही. त्याचबरोबर कल्याण खाडीकिनारा विकसित करण्यात येणार आहे. सिटी पार्कप्रमाणेच दुर्गाडी खाडीकिनारी शिव आरमार स्मारक उभारणे प्रस्तावित आहे.