- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेच्या म्हारळ गाव शेजारील राणा डॉम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर गेल्या दीड वर्षांपासून प्रक्रिया करण्याचे सुरू आहे. मात्र प्रक्रियांचे काम संथगतीने होत असल्याने, २५ टक्केही काम झाले नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
उल्हासनगर महापालिकेचे म्हारळ गाव शेजारील राणा डॉम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्याने, डॉम्पिंग ग्राऊंड खालील नागरीवस्तीला धोका निर्माण झाला. डॉम्पिंगसाठी महापालिकेकडे पर्यायी जागा नसल्याने, नाईलाजास्तव कॅम्प नं-५ येथील खडी खदान येथील मोकळ्या जागेवर कचरा टाकण्यास सुरवात केली. स्थानिक नागरिक व परिसरातील नगरसेवकांनी या डॉम्पिंगला विरोध करून उपोषण, धरणे आंदोलन, महासभेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन, मुंडन आंदोलन करण्यात आले.
मात्र डॉम्पिंगसाठी पर्यायी जागा नसल्याने, शहरातील कचरा खडी खदान येथे टाकण्यात येत आहे. डॉम्पिंगचा भविष्यातील धोका ओळखून तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, सुधाकर देशमुख यांनी राज्य शासनाला डॉम्पिंगच्या समस्यांची माहिती देऊन, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पर्यायी जागेची मागणी केली. अखेर शासनाला जाग येऊन शहरा शेजारील उसाटने गाव हद्दीतील एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा महापालिकेला हस्तांतर केली. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी, याठिकाणी एक ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.
महापालिकेच्या जुन्या ओव्हरफ्लॉ झालेल्या राणा डॉम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्माण करण्याची योजना राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने, गेल्या दीड वर्षांपासून सुरू केली. मात्र गेल्या दीड वर्षात २५ टक्केही काम पूर्ण झाले नसल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे. इतर योजने प्रमाणे या योजनेचा फज्जा उडणार असल्याचेही बोलले जाते.
महापालिका सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनिष हिवरे, मुख्य आरोग्य अधिकारी एकनाथ पवार यांनी राणा डॉम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रियाचे काम सुरू असून २५ टक्के पेक्षा जास्त काम झाल्याची प्रतिक्रिया दिली. उपमहापौर भगवान भालेराव हे राणा डॉम्पिंग ग्राउंड असलेल्या परिसरारून नगरसेवक पदी निवडून आले असून कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गेल्या दीड वर्षात किती टक्के काम झाले. याबाबत कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले. एकूणच डॉम्पिंगच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून याबाबत आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी. अश्या मागणीने जोर धरला आहे.
९ कोटीच्या योजनेवर प्रश्नचिन्हे?
महापालिका हद्दीत राबविण्यात आलेल्या बहुतांश मोठया योजनेचा फज्जा उडाला असून राणा डॉम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या कामावरही प्रश्नचिन्हे उभे ठाकले. ४५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी गळती व पाणी टंचाईची समस्या जैसे थे आहेत. तसेच खेमानी नाला, भुयारी गटार योजना अश्या अन्य योजना कधी पूर्ण होणार? असा प्रश्नही विचारला जात आहे.