- सदानंद नाईक उल्हासनगर : कॅम्प नं-५, भाटिया चौकातील रस्त्याच्या संथ कामाची आमदार बालाजी किणीकर यांनी पाहणी सोमवारी करून अभियंता तरुण सेवकांनी यांना धारेवर धरले. एका बिल्डराला फायदा मिळण्यासाठी रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप आमदार किणीकर यांनी केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-५, भाटिया चौक ते गाऊन मार्केट रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र खोदलेल्या नालीचे काम अर्धवट असल्याने, व्यापारी व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांच्याकडे साकडे घातल्यानंतर, किणीकर यांनी सोमवारी दुपारी रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख रमेश चव्हाण आदीजन उपस्थित होते. आमदार किणीकर यांनी महापालिका अभियंता तरुण सेवकांनी यांना धारेवर धरून रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली. एका वर्षांपूर्वी मंजूर झालेले विकास काम संथ का? असा प्रश्नही आमदारांनी उपस्थित केला. खोदलेल्या खड्ड्यामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याचे किणीकर म्हणाले. विकास काम चुकीचे चालू असल्याची कबुली यावेळी अभियंता सेवकांनी यांनी आमदारांना दिली.
भाटिया चौक परिसरातील सुस्थितीत असलेल्या रस्त्याला खोदून दुरावस्था केल्या प्रकरणी कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी १५ दिवसांपूर्वी याच ठिकाणी आंदोलन केले होते. महापालिकेने आश्वासन देऊन, काम तसेच अर्धवट ठेवले. एका बिल्डरच्या फायद्यासाठी काहीजण विकास कामात अडथळे आणत असल्याचा गंभीर आरोप किणीकर यांनी केला. बिल्डरला फायदा पोहचनारा कोण? अशी चर्चाही यानिमित्ताने शहरात रंगली आहे.