बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या मध्यावर असलेल्या वडवली येथील तलावातील गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शासकीय यंत्रणेची मदत न घेता लोकसहभागातून दीड कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करुन हा तलाव स्वच्छ करण्यात आला आहे. यंदाच्या पावसात हा तलाव भरल्यावर त्यांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मात्र या तलावाच्या शेजारी अंबरनाथ पालिकेचे मलशुध्दीकरण केंद्र असून या केंद्रातील मलवाहिनीला गळती लागल्याने सर्व दूषित पाणी हे थेट तलावात येत आहे. त्यामुळे ही फुटलेली मलवाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे.चिखलोली येथील शिवमंदिर तलाव गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होतो. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या तलावातील पाण्याची पातळी घटली होती. अनावश्यक वनस्पती निर्माण झाल्याने या तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रस्तावही तयार करण्यात आला होता. मात्र पालिकेचा हा प्रस्ताव केवळ फाईलबंद राहिला. तलावाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने या परिसरातील युवकांनी एकत्र येत तलावातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले. मात्र एवढ्या मोठ्या तलावातील गाळ काढणे एका वर्षात शक्य नसल्याने दोन टप्प्यात हे काम करण्यात आले. २०१८मध्ये दीड महिना काम करुन निम्मा गाळ काढण्यात आला तर उर्वरित गाळ एप्रिल आणि मे महिन्यात काढण्यात आला. या तलावातील गाळ पूर्ण काढण्यात आला असून आता हा तलाव पूर्वीपेक्षात पाच ते सहा फूट खोल झाला आहे. काही ठिकाणी तर १० फूटापेक्षा जास्त खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा हा तलाव आता १५ ते २० फूट खोल झाला आहे. या तलावातील गाळ काढून त्या परिसराचेही सुशोभिकरण केले गेले. या परिसरात आता विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. त्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या तलावातील पाणी थेट पंपाद्वारे प्रत्येक वृक्षाला जाईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे.या तलावातील गाळ काढल्यानंतर या तलावात काही प्रमाणात दूषित पाण्याचा प्रवाह येत असल्याचे लक्षात आले आहे. तलावाच्या शेजारीच मलशुध्दीकरण केंद्र असल्याने याच केंद्रातील मैला पाणी तलावात येत आहे. तलावातील पाणी स्वच्छ रहावे यासाठी मलनिस्सारण वाहिनीची दुरुस्ती करण्याची गरज आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी अंबरनाथ पालिकेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र तरी त्याच्यावर कोणताच तोडगा निघालेला नाही. भुयारी गटाराची वाहिनी दुरुस्त न झाल्यास तलावात दूषित पाणी मिसळून रोगराई पसरण्याची व तलावाच्या कामावर बोळा फिरण्याची शक्यता आहे.तलावातील गाळ काढण्याचे काम करतांना त्या कामासाठी खर्च कसा करायचा हा प्रश्न पडला होता. मात्र सहकारी मित्र आणि शहरातील अनेक मान्यवरांनी काही प्रमाणात मदत केली. अपेक्षेपेक्षा दुप्पट खर्च झालेला असला तरी ते काम आज पूर्ण झाले याचे समाधान आहे.- तुकाराम म्हात्रे, जीबीडी ग्रुप प्रमुख.
वडवलीच्या तलावातील गाळ लोकसहभागातून काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:23 AM