ठाणे : मुंबईप्रमाणेच ठाणे शहरातील झोपडपट्टीधारकांनादेखील ३०० चौरस फुटांचे घर मिळावे, या मागणीसाठी भरपावसात झोपडपट्टीतील शेकडो रहिवाशांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन दिले. मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला.
मुंबई शहरात पूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत २६९ चौरस फुटांचे घर दिले जात होते. मात्र, गेल्या वर्षापासून मुंबईमध्ये राहणाºया झोपडीधारकांना ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय झाला. तो ठाणे शहरातील झोपडीधारकांनाही लागू करा. त्यांनाही ३०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे, अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा या मोर्चेकऱ्यांनी दिला. ठाणे महानगरपालिका हद्दीत विविध जमिनींवर एकूण २१० झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे साडेनऊ लाखांच्या घरात नागरिक वास्तव्य करीत आहेत.
झोपडपट्टीवासियांचे राहणीमान सुधारावे, यासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यात मुंबईसाठी एक व ठाण्याला वेगळा न्याय का, असा प्रश्न ठाणे शहर झोपडपट्टी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष राकेश मोदी यांनी केला. मोर्चात आनंद कांबळे, महादेव पवार, विजयप्रताप सिंह, इमॅन्युअल नाडार, प्रमोद पांडे, सुरेश खेराडे, सीताराम नायडू, बाबा राऊत, उमा भालेराव आदींचा समावेश होता.