डोंबिवली : कोरोनाला रोखण्यासाठी केडीएमसीची यंत्रणा व्यस्त असताना दुसरीकडे शहरातील झोपडपट्ट्यांकडे प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. भरलेली गटारे, खड्डे पडलेल्या पायवाटा, वस्तीमधील बंद पथदिवे आणि पडझड झालेल्या बालवाड्या असे पूर्वेतील इंदिरानगर झोपडपट्टीमधील चित्र पाहता याची प्रचिती येते. स्वच्छतेचे वाजलेले तीनतेरा आणि अंधारामुळे पायपीट करणेही जिकरीचे बनल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शहरांमधील झोपडपट्ट्यांमध्ये कचरावेचक, रिक्षाचालक, बिगारी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, फेरीवाले, असे लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. मात्र, इंदिरानगर झोपडपट्टीतील अवस्था अत्यंत बिकट आहे. तेथील शौचालयांना दरवाजे नाहीत, तर असलेले काही दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालयांची नियमित स्वच्छता होत नाही. गटारे तुडुंब भरलेली असल्याने कोरोनाकाळात स्थानिकांना अन्य आजार जडण्याची भीती व्यक्त होत आहे. अनके ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अपघात होऊन जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडेही लक्ष वेधले जात आहे.
रिपाइंचे केडीएमसीला पत्र
कोरोनाकाळात झोपडपट्ट्यांकडे झालेले दुर्लक्ष पाहता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवले आहे. झोपडपट्ट्यांमधील समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी भेटीसाठी वेळ द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. कोरोना लसीकरणासंदर्भातही त्यांनी लक्ष वेधले आहे.
------------
लस नोंदणी केंद्र स्थापन व्हावे
- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये मनपाचे समुपदेशन केंद्र असणे गरजेचे आहे. याठिकाणी राहणारा वर्ग मोठ्या प्रमाणात अशिक्षित आहे. कोरोना लसीकरणासाठी गरजेच्या असलेल्या ऑनलाईन नोंदणीबाबत माहितीचा अभाव आहे.
- अनेकांकडे अँड्राॅईड मोबाईल नसल्यामुळे त्यांची नोंदणी करताना गैरसोय होत आहे. झोपडपट्ट्यांमध्ये लस नोंदणी केंद्र स्थापन करून प्रशिक्षित अधिकारी अथवा स्वयंसेवक यांच्याकडून नोंदणी करणे गरजेचे आहे. आयुक्तांनी यात विशेष लक्ष घालावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
----------------------