ठाणे: काटई, कोनगाव आणि खारघर टोलनाक्याप्रमाणे मुंबईतील पाच टोलनाक्यांवरील लहान चारचाकी एमएच- शून्य चार या ठाण्यातील वाहनांची त्वरित टोलमुक्ती करुन महायुती सरकारने ठाणेकर जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, पालघर व ठाणे समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. ठाणेकरांना नाहक टोलचा भूर्दंड बसतो. याकडे लक्ष वेधतांनाच मनसेच्या आंदोलनावरही परांजपे यांनी टीका केली.
संपूर्ण टोलमुक्तीसाठी एमएससीआरडीएचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, एमएसआरडीएचे अधिकारी, टोल कॉन्ट्रॅक्टर यांनी एकत्र बसून टोलप्रश्नावर धोरण ठरवावे आणि मुंबईतील, दहिसर, ऐरोली, वाशी, आनंदनगर, एलबीएस मुलुंड यां पाच एन्ट्री पाॅईंट टोलनाक्यांवरील टोलप्रश्नांवर मार्ग काढून जनतेला, महायुती सरकारने दिलासा द्यावा, अशी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
टोलसंदर्भात आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. अविनाश जाधव यांची ही नेहमीची सवय आहे की काहीतरी नाटकीय आंदोलन करायचे, कार्यकर्त्यांना वेठीस धरायचे, प्रसिद्धीचा स्टंट करायचा आणि कुठल्याही लॉजिकल एण्डला आंदोलन जाईल, असे कधीच पहायचे नाही, असे अविनाश जाधव यांच्या साखळी उपोषणाबाबत ते म्हणाले.
राज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले तर याच्यातून काहीतरी तोडगा निघू शकतो, असे आपण जाधव यांना आधीच बाेलल्याचेही ते म्हणाले. २०१० ते २०२६ पर्यत टोलचा करार एमईपीएल बरोबर आहे. दर तीन वर्षांनी १ ऑक्टोबरला पाच रुपये हे टोलमागे वाढविले जातात. मागच्यावेळी १ ऑक्टोबर २०२० ला पाच रुपये टोलमागे वाढविले होते. २०१० पासून टोलवाढीची प्रक्रिया सुरू आहे. टोलमुक्तीसाठी एमएससीआरडीएचे खाते असलेल्या मुख्यमंत्र्यांना जर राज ठाकरे भेटले तर काही मार्ग निघू शकेल हीच राष्ट्रवादीची भूमिका आहे, असे परांजपे यांनी स्पष्ट केले.
अश्रू आणून आम्ही आमची श्रद्धा दाखवत नाही२ मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा आम्हालादेखील अश्रू अनावर झाले होते. पवार साहेबांबाबत आमच्याही आदरयुक्त भावना आहेत मात्र आम्ही डोळ्यात सारखे अश्रू आणून आमची श्रद्धा दाखवत नाहीत. सारखे अश्रू आणून जितेंद्र आव्हाड काही साध्य करतील असे वाटत नाही, असा टोलाही आनंद परांजपे यांनी मारला.