ठाणे : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणे शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांपैकी काही अर्धवट आहेत, तर काही विविध स्वरूपांच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही प्रकल्पांसाठी निधीची केवळ तरतूद केली असून त्यांची कामे मात्र सुरू झालेली नाहीत. यामुळे अशा प्रकल्पांचा निधी शहरातील इतर तातडीच्या आणि महत्त्वाच्या कामांसाठी वळता करावा, अशा सूूचना महापौर नरेश म्हस्के यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत दिल्या. त्या अनुषंगाने शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव यांनीदेखील त्यानुसार याचा अभ्यास करून स्मार्ट सिटीकडे पत्रव्यवहार करून हा निधी इतर कामांसाठी वळता करता येऊ शकतो का, याची माहिती पुढील बैठकीत द्यावी, असे आदेश ठाणे महापालिकेला दिले आहेत.
स्मार्ट सिटीच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत महापौर म्हस्के यांनी लाल-पिवळा रंग फुटपाथला दिला म्हणजे स्मार्ट सिटी होत नसल्याचे सांगून प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर, शुक्रवारी झालेल्या बैठकीतदेखील त्यांनी पुन्हा याच मुद्याला हात घालून स्मार्ट सिटीत सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांची पुन्हा एकदा चिरफाड केली. सौरऊर्जा प्रकल्पाचा पालिकेला काय फायदा झाला, वॉटर फ्रंट प्रकल्पाची कामे अर्धवट स्थितीत आहेत, कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर आदींसह इतर प्रकल्पांची अवस्थाही जैसे थे अशीच आहे, फ्री वायफाय सुरू आहे का? पाण्याचे मीटर लावले, ते चांगले आहेत का?, त्यांची निगा देखभाल कोण करणार, त्यावर कंट्रोल कोणाचे आहे?, याची माहिती घेतली गेली का? असे अनेक सवाल करून त्यांनी पुन्हा आक्षेप नोंदविले.