कल्याण : कल्याण पश्चिमेतील ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील वडवली परिसरात निर्मल लाइफ स्टाइल या बिल्डरने ओपन लॅण्ड टॅक्सची थकबाकी न भरल्याने महापालिका प्रशासनाने गुरुवारी गृहसंकुलातील २२ सदनिका सील करून दणका दिला. या बिल्डरकडे ओपन लॅण्ड टॅक्सची १० कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. या कारवाईमुळे इतर बिल्डरांचेही धाबे दणाणले आहेत. त्यांच्याविरोधातही कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, धनादेश थांबवण्याच्या सूचना बिल्डरने बँकेला दिल्याने ते वटले नव्हते. त्यामुळे नोटीसही बजावण्यात आली आहे.
महापालिकेने थकबाकीदार निर्मल लाइफ स्टाइल या बिल्डरला प्रथम नोटीस पाठवली होती. त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने बिल्डरच्या मालमत्तेचा लिलाव २२ मार्चला ठेवला होता. त्यानंतर या बिल्डरने थकबाकीपैकी सहा कोटी ५० लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. २२ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत त्याने सहा कोटी ५० लाखांचे धनादेश टप्प्याटप्प्याने महापालिकेला दिले. मात्र, धनादेशाचे पेमेंट थांबवण्यात आल्याने ते वटलेच नाहीत. करनिर्धारक व संचालक विनय कुलकर्णी यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या ही फसवणूक लक्षात आणून दिली. त्यानंतर बिल्डरला रोख भरण्यास सांगण्यात आले. त्याला दाद न मिळाल्याने बोडके यांनी कारवाईसाठी महापालिकेचे पथक पाठवले. या पथकाने कारवाई करत थकबाकीच्या रकमेइतक्या किमतीच्या २२ सदनिका सील केल्या. यावेळी प्रभाग अधिकारी सुधीर मोकल उपस्थित होते. तसेच धनादेश न वटल्याने बिल्डरला निगोशिएबल इन्व्हेस्टमेंट अॅक्टच्या आधारे नोटीस बजावली आहे. ही नोटीस देऊ न पाच दिवस झाले असून १५ दिवसांत खुलासा करणे आवश्यक आहे. यावर समाधानकारक उत्तर न आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश बोडके यांनी कुलकर्णी यांना दिले आहेत.गतवर्षीच्या वसुलीत रक्कम जमामहापालिकेने मार्च २०१८ अखेर मालमत्ता, नगररचनाकर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून ३७८ कोटी रुपये जमा केले होते. त्यामध्ये जप्त केलेल्या मालमत्तांची रक्कमही समाविष्ट केली होती. मालमत्ता जप्त केलेली रक्कम वगळता महापालिकेच्या तिजोरीत ६३२ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले होते. त्यात मालमत्ताकराची वसुली ३३८ कोटी ३३ लाख रुपये होती.३१ मार्चनंतरही महापालिकेची वसुली मोहीम थांबलेली नसून ती सुरूच आहे. ३१ मार्चपश्चातही १ ते १० एप्रिल २०१८ दरम्यान महापालिकेने मालमत्ताकराच्या स्वरूपात तीन कोटींची वसुली केली आहे. त्यापाठोपाठ आज सील केलेल्या सदनिकांची रक्कमही मालमत्ताकराच्या वसुलीत धरली जाणार आहे.