ठाणो : दोन महिन्यांवर पावसाळा आला असल्याने शहरातील नाल्यांची सफाई वेळेत व योग्य पद्धतीने व्हावी, अशी मागणी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली. तसेच काही ठेकेदारांकडून नाल्यांची सफाई योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याचा आरोपही या वेळी त्यांनी केला. त्यामुळे वर्षातून दोन वेळा नालेसफाईची मागणीदेखील केली. परंतु, यासाठी असलेली तरतूद ही कमी असल्याने नालेसफाईची कामे काही ठिकाणी अर्धवट राहतात. मात्र, तरीही नालेसफाईची कामे योग्य केली जातील, असा दावा प्रशासनाने केला. तर नालेसफाईसाठी आवश्यक वाढीव तरतूद करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले.
स्थायी समितीच्या या बैठकीत अनेक सदस्यांनी नालेसफाईच्या कामांवर, प्रशासनावर आगपाखड केली. ही कामे योग्य प्रकारे करण्यात येत नसल्याचा आरोप विमल भोईर यांनी केला. कोपरीतील दोन नाले हे ठाणे आणि मुंबई महापालिका हद्दीत असल्याने त्यांची अर्धवट सफाईच होत असते. त्यावर योग्य तो ताेडगा काढण्याची मागणी मालती पाटील यांनी केली. तर काही ठिकाणी नालेसफाईची कामे अर्धवट केली जात असून, त्यामुळे पहिल्या पावसातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा ठेकेदांना कामे न देता त्यांनी काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी सदस्यांनी केली. तर वर्षातून दोन वेळा नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली. तसेच रुस्तमजी येथील नाल्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, यासंदर्भात घनकचरा उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी वर्षातून दोन वेळा नालेसफाई करणे शक्य नसल्याचे सांगितले. शहरात शेकडो नाले असून त्यासाठी केवळ ९ कोटींची तरतूद केली जाते. ती तरतूद तोकडी पडत आहे. त्यामुळे दोनदा नालेसफाई करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर एप्रिल महिन्यात नालेसफाईला सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नालेसफाई ही पूर्वीच्याच पद्धतीने करण्यात यावी. परंतु निधी कमी पडत असेल तर त्या दृष्टिकोणातून निधीमध्ये वाढ करण्यात यावी, असे आदेश सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाला दिले. तसेच दोन मोठे आणि दोन छोटे पोकलेन घेण्याचे नियोजन केले असल्याने त्यानुसार वर्षभर नालेसफाई करता येईल, असा दावाही त्यांनी केला आहे.