ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश्य २७ व एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर मलेरियाचे ७६ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय ५१ हजार ५६१ घरांच्या तपासणीत एक हजार ४९६ घरांत दूषित पाणी आढळले आहे. यामुळे शहरात ठामपाने ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ६ ईरिक्षांसह आठ बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात एक हजार ७६६ ठिकाणी औषधफवारणी आणि ४० धूरफवारणी हॅण्डमशीनद्वारे १० हजार २९४ ठिकाणी धूरफवारणी केली आहे.
शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत धूर, औषधफवारणीचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात ती सुरू आहे. दरम्यान, पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नयेत यासाठी प्रत्यक्ष घरी जाऊन पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीत ऑगस्टमध्ये डेंग्यूचे संशयित २७ आणि निश्चित निदान केलेला एक रुग्ण आढळला. तसेच मलेरियाचे याच कालावधीत ७६ रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाच्या वतीने शहरात गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत असून, एकूण ५१ हजार ५६१ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार ४९६ घरे दूषित आढळली. तसेच एकूण ७६ हजार ९१२ कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी एक हजार ५६७ कंटेनर दूषित आढळले. या ४९७ दूषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले. तर ९८८ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.