ऐरोली येथील एका शाळेच्या बसला इंजिनमधील बिघाडाने शॉटसर्किट होऊन आग लागल्याची घटना सोमवारी घडली. ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत यातील विद्यार्थ्यांना तातडीने सुरक्षितरित्या बाहेर काढून अग्निरोधकाच्या (फायर एक्सटिंग्युशर) मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे सुदैैवाने १६ विद्यार्थ्यांसह १९ प्रवाशांचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ऐरोली येथील न्यू होरायझन पब्लिक स्कूलमधील पहिली ते तिसरीतील १६ विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी माजीवडा येथून ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय भागाकडे ही बस दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास जात होती. रेड सिग्नलमुळे ही बस तीन हात नाका येथे उभी होती. त्याचवेळी अचानक बसच्या इंजिनमध्ये धूर येऊ लागला. ही बाब वाहतूक नियंत्रण शाखेच्या नौपाडा युनिटमधील पोलिसांच्या निर्दशनास आली. तेव्हा सहायक पोलीस आयुक्त संजय वेरणेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे तसेच पोलीस नाईक ठाकूर, जाधव, नांगरे, अजित खैरमोडे आणि पोलीस शिपाई अतुल डहाळे यांनी बस एका बाजूला घेऊन बसमधील विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान ठाणेअग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काहीशी धुमसत असलेली आगही आटोक्यात आली. वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये सहा ते नऊ वर्ष वयोगटातील १६ विद्यार्थी तसेच चालक किरण पाटील (३९) आणि मदतनीस ललकार सावत आणि अनिता पवार असे १९ जण होते. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून ही आग किरकोळ असल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतुक पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. विद्यार्थ्यांना बाहेर काढून तात्काळ त्यांनी सुरक्षित ठिकाणी नेले. त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या कामातही मोलाची भूमीका बजावली. - बाळासाहेब पाटील , पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे शहर