मीरारोड : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर मॅफेड्रोन या अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तस्करास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून १८ लाख ९४ हजार ५०० रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले.
मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल जवळ एक इसम एमडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याचे गुन्हे शाखेला समजले. गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील व सहायक आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे निरीक्षक देविदास हंडोरे, सहायक निरीक्षक विलास कुटे, धनाजी इंगळे, पवन पाटील, अजय यादव, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पथकाने मंगळवारी १४ सप्टेंबर रोजी सापळा रचला.
रेल्वे स्थानकाबाहेर आलेल्या सादक रशीद अन्सारी (१९) रा. एम. जे. अपार्टमेंट, नगीनदास पाडा, नालासोपारा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३७९ ग्रॅम एमडी सापडले. त्याची बाजारात १८ लाख ९४ हजार ५०० रुपये इतकी किंमत आहे. नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
........
वाचली