ठाणे : वागळे इस्टेट परिसरातील डिसोझा वाडीतील कृष्णा वंदना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील (रूम नंबर २८) किशोर चव्हाण यांच्या घरात शनिवारी सकाळी धामण जातीचा साप दिसला. त्या सापाला सर्पमित्राच्या मदतीने पकडण्यात आले. यामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. चव्हाण यांच्या स्वयंपाकघरातील ओट्या खालील जागेत धामण जातीचा साप असल्याचे समजताच त्यांनी त्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार त्या कक्षातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ सर्पमित्रालाही पाचारण केले. यावेळी सर्पमित्राने त्या सापाला पकडून जंगलात सोडण्यासाठी नेले. चौथ्या मजल्यापर्यंत त्या सर्पाची मजल गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पकडलेला सर्प हा धामण जातीचा (Ptyas mucosus) असून तो तीन फुटांचा आहे. ही भारतात आढळणारी बिनविषारी सापाची जात आहे. उंदीर व तत्सम प्राण्यांचा फडशा पाडणारी धामण ही मानवमित्र असल्याचे म्हटले जाते.
इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत गेली सापाची मजल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 5:15 AM