मीरारोड - भाईंदर पूर्वेला कांदळवन लगतच्या भागात तब्बल साडे नऊ फूट लांबीचा अजगर सापडला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडून मुख्यालयात ठेवले असून गुरुवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागाकडे सुपूर्द करणार आहेत.
नवघर मार्गावरील सरस्वती नगरच्या मागे कांदळवन परिसरात महापालिकेने मार्केट इमारतीचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यात काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्या तेथे बांधलेल्या आहेत. मंगळवारी रात्री एका झोपडीत हा भला मोठा अजगर आढळून आला. इतका मोठा अजगर पाहून मजुरांची घाबरगुंडी उडाली. आजु बाजूची लोकं सुद्धा अजगर ला पाहण्यासाठी जमले.
पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी अजगर ला पकडून भाईंदर पश्चिम येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात नेऊन ठेवले आहे . गुरुवारी अजगरास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन विभागाच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे प्रभारी अग्निशमन दल प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. येथे दाट कांदळवन असून सदर अजगर या परिसरात असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे.