ठाणे: स्नॅपचॅट हॅक करुन बनावट इन्टाग्रामचे अकाऊंट बनवून नौपाडयातील एका १८ वर्षीय तरुणीला सतत मानसिक त्रास देणा-या दर्श शांतीलाल सत्रा (२१) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. गेली सहा सात महिने चिवटपणे या प्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अखेर जेरबंद केले.नौपाडयात राहणारी ही तरुणी विलेपार्ले येथील गांधी कॉलेज आॅफ मॅनेजमेंट मध्ये मास मिडीयाचे शिक्षण घेत आहे. तिथेच तिच्या स्रॅपचॅर्टवर सुरुवातीला फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवून त्याने तिच्याशी मैत्रि केली. ‘तुला मुले आवडतात, तू मुलांचे आयुष्य खराब का करतेस’? असे म्हणत त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तब्बल सहा महिने त्याने त्रास दिल्यानंतर त्याने तिचे स्रॅपचॅटचे अकाऊंटही हॅक केले. या त्रासाला कंटाळून तिने अखेर स्रॅपचार्टही बंद केले. पुढे त्याने तिच्या इन्स्टाग्रामवर जानेवारी २०१७ मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचा आणि तिच्या मित्राचे फोटो ठेवून तिच्या मित्र मैत्रिणींनाही त्याने मेसेज पाठविले. नंतर अनेक मुलांची नावे पाठवून वॅलेंटाइन डे जवळ येत आहे, काळजी घे, असा मेसेज पाठवून तिला त्रास देणे सुरु केले. त्यानंतर तिने इन्स्टाग्रामही बंद केले. पुढे त्याने तिचे वडील आणि भावालाही मेसेज करुन तिच्यासह तिच्या कुटूंबालाही मानसिक त्रास दिला. शिवाय, तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करुन त्याद्वारे तिचे फोटो इतरांना पाठवून तिची फसवणूक आणि बदनामी केल्याप्रकरणी तिने त्याच्याविरुद्ध १ जून २०१७ रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली दाखल असलेल्या या गुन्हयाचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव, निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सावध आणि चिवटपणे तपास करुन उपनिरीक्षक अजय गंगावणे यांच्या पथकाने दर्श याला मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
स्नॅपचॅट हॅक करुन ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ: मुंबईतील तरुणाला अखेर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 8:13 PM
बनावट इन्टाग्रामचे अकाऊंट बनवून त्याद्वारे एका तरुणीचे फोटो तिच्या मित्र मैत्रिणींना पाठवून तिलाही वारंवार मानसिक त्रास देणा-या दर्श सत्रा या तरुणाला नौपाडा पोलिसांनी सात महिन्यांच्या तपासानंतर अटक केली आहे.
ठळक मुद्देसात महिन्यांच्या तपासानंतर नौपाडा पोलिसांची कारवाईबनावट इन्स्टाग्रामच्या अकाऊंटद्वारे तिचे फोटो इतरांना पाठविलेमाहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हयाचा पोलिसांनी केला कौशल्याने तपास