मीरा रोड - गेल्या पावसाळ्यात उत्तन-डोंगरी येथे खचलेला रस्ता दुरुस्त करायची उपरती आता झालेल्या मीरा-भाईंदर महापालिकेने संरक्षण भिंत बांधण्यासाठी चक्क ब्रिटिशकालीन जुनी मोठी विहीरच बेकायदा माती भराव करून बुझवायला घेतल्याने कारवाईची मागणी स्थानिकांसह वनशक्ती संस्थेने केली आहे. भाईंदरच्या डोंगरी - उत्तन ह्या मुख्य रस्त्यावर लहान व अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या पावसाळ्यात आनंद नगर येथे तलावाची संरक्षण भिंत खचली. जेणेकरून रस्ता काहीसा खचला. तर काही फुटांवरच ब्रिटिशकालीन जुन्या विहिरी लगतचा रस्ता खचला. तर सदर दोन्ही ठिकाणी खचलेल्या भागावर महापालिकेने गेल्या पावसाळ्यापासून दुरुस्ती कामच हाती घेतले नाही.
येथे वाहन चालकांना इशारा मिळेल, अश्या आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत. येथील रस्त्यात बसवलेल्या लोखंडी सुरक्षा खांबामुळे रात्रीच्या काळोखात अपघात होऊ लागले. तर पालिकेने समोरच्या बाजूने रस्ता वाढवण्याकडेसुद्धा डोळेझाक केली. जेणेकरून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर यामुळे टीकेची झोड उठली.
त्यातच आता पावसाळा तोंडावर आल्यावर पालिकेला जाग आली आणि विहिरीकडील रस्त्याची दुरुस्ती संरक्षक भिंत बांधून करण्याऐवजी महापालिकेच्या महाभागांनी खचलेल्या ठिकाणची सुस्थितीत असलेली ब्रिटिशकालीन विहीरच भराव टाकून बंद करण्याचा प्रकार सुरू केला. पालिकेच्या या अजब कारभारावर टीकेची झोड वेलेरिन पांडरीक, शॉन कोलासो आदींनी उठवली व संताप व्यक्त केला. पालिकेने संरक्षक भिंत बांधण्याऐवजी जुनी विहीरच बुझवण्याचा केलेला प्रकार म्हणजे एखाद्या डायबेटिक रुग्णास पायच्या बोटाला गँगरिन झाल्यामुळे त्या रुग्णाचा संपूर्ण पायच काढून टाकणे, असा उफराटा असल्याची टीका कोळसे यांनी केली आहे. त्यांच्यासह वनशक्तीचे संचालक स्टॅलिन यांनी देखील विहिरीतील भराव काढून सबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि विहिरी पूर्ववत करून संरक्षण भिंत रस्त्यासाठी बांधून घ्यावी अशी मागणी केली आहे. पालिकेचे अधिकारी मात्र विहिरीचा भाग पडल्याने रस्ता खचला असून, धोकादायक झाला आहे. त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्यासाठी भराव करत असल्याचे कारण सांगितले. महापालिका आणि येथील काही लोकप्रतिनिधी यांनी निसर्ग व पर्यावरणाचा सतत ऱ्हासच चालवला असून, या आधी देखील अनेक प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरी देखील पालिका निसर्गाचा नाश करण्याचे प्रकार थांबवत नसल्याने चीड स्टॅलिन यांनी व्यक्त केली आहे. संरक्षण भिंत बांधायची म्हणून उद्या तलाव, खाडी आणि समुद्र सुद्धा भराव टाकून पालिका बंद करणार का ?, विहिरी , तलाव, खाडी , नैसर्गिक प्रवाह आदी बुझवता येत नाहीत व त्यात बांधकामे करता येत नाही असे ते म्हणाले.