ठाणे : जिल्ह्यातील उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड या राज्यांमध्ये आतापर्यंत २१ हजार ४७५ स्थलांतरित मजुरांना १७ ट्रेनमधून तर एक ५५३ बसेसमधुन ३४ हजार ४८५ जण आदी आज अखेरपर्यंत ५६ हजार मजुर त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे. तर ६५ हजार पेक्षा अधिक जणांनी नोंदणी झाली असून परवानगी मिळताच त्यांना त्यांच्या राज्यात व जिल्ह्यात पाठविण्यात येणार, अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.
लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. पायी, तसेच मिळेल त्या वाहनातून आपल्या गावी परतण्याचे प्रयत्न हे मजुर करीत. आहेत. जिल्हा प्रशासनाने या मजुरांची यादी तयार करुन त्यांना रेल्वेने घरी पोहोचविण्यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. तसेच पायी चालणाऱ्या मजुरांना एका ठिकाणी थांबवून एसटी बसेसने रवाना करण्यात आले. राज्य सरकार आणि रेल्वेमंत्रालयाने वाहतुकीची विशेष व्यवस्था केल्याने या मजुरांनी आपल्या घराची वाट धरली आहे. जिल्ह्यातून उत्तर प्रदेशसाठी दोन रेल्वेने दोन हजार ८३३मजुर, बिहारसाठी आठ रेल्वेने दहा हजार ६३२ मजूर , मध्यप्रदेशसाठी दोन रेल्वे ने एक हजार ६५२ मजूर, राजस्थानसाठी तीन रेल्वेने तीन ४९४ मजुर रवाना झाले आहेत. ओरिसा राज्यासाठी एका रेल्वेने एक हजार ३६४, झारखंडसाठी एका रेल्वेने एक हजार ५०० मजूर रवाना करण्यात आले आहेत. आज अखेरपर्यत ठाणे जिल्हा प्रशासनाकडे रेल्वेने घरी जाण्यासाठी ६५ हजार पेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. संबंधित राज्यांशी समन्वय साधून त्यांची परवानगी मिळाल्यानंतर रेल्वेचे नियोजन करण्यात येत आहे.मुंबईतील ठाणे मार्गे अनेक मजूर उत्तर भारतात जात आहेत. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, माजिवाडा, तीन हात नाका, आदी पिकअप पॉइंटवरून मजुरांना सोडण्यासाठी बसेस सोडण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच त्यांना सोडण्यात येत आहे.या मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पोलीस आणि महसूल विभाग समन्वय साधत आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील हे सर्व नियोजन करीत आहेत.