ठाणे : चिनी बनावटीच्या सुट्या पार्टपासून थेट ब्रॅण्डेड कंपन्यांच्या टीव्ही संचांची अजय सिंह (४०) हा भिवंडीच्याच दुकानातून निर्मिती करत होता. त्याने आतापर्यंत अशा ४०० बनावट टीव्ही संचांची विक्री केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत उघड झाली आहे.नामांकित ब्रॅण्डच्या नावाखाली बनावट टीव्हीची निर्मिती करून त्यांची विक्री केल्याप्रकरणी अजय या भिवंडीतील व्यापाऱ्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या पथकाने २० मार्चला अटक केली. त्याच्याकडून ६० टीव्ही संचांसह इतर सामग्री असा पाच लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. भिवंडीतील मार्केटमध्ये दहा वर्षांपासून तो वेगवेगळे ‘उद्योग’ करतो. वर्षभरापासून एका सॉफ्टवेअरद्वारे नामांकित टीव्ही कंपन्यांचे सिम्बॉल अपलोड करून ते दुकानातच साडेसहा ते सात हजारांमध्ये बनवलेल्या टीव्ही संचांना लावले जात होते. त्यांची १२ ते १३ हजारांमध्ये विक्र ी केली जायची. ३२ इंची ३० हजारांच्या ब्रॅण्डेड टीव्हीची ६० टक्के सवलतीत विक्री करत होता.काल्हेर येथील ‘एचबी इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्स’ या दुकानामधून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार आदींच्या पथकाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार उघड झाला. हे दुकानही त्याने १२ हजार रुपये भाडेतत्त्वावर घेतले आहे. यात आणखी त्याचे कोण साथीदार आहेत का, याचा तपास सुरू आहे.
आतापर्यंत ‘त्याने’ विकले तब्बल ४०० बनावट टीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:45 AM