ठाणे - एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी अब तक छप्पन चित्रपटातील वन अ पोलीस ऑफिसर ऑलववेज अ पोलीस ऑफिसर हा डायलॉग म्हणत पोलीस खात्याला राम राम ठोकला. शर्मांनी आज सायंकाळी ६ वाजता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं असून उद्धव ठाकरे जी कामगिरी देतील ती पार पाडेन असं म्हटलं आहे. तसेच माझ्या पडत्या काळात शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मला खूप मदत केल्याचं सांगत बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्ही जे एन्काउंटर स्पेशालिस्ट होतो, त्या आम्हा सर्वांना बोलावून आमच्या अडीअडचणी जाणून आमच्या पाठीवर हात फिरवत पाठबळ दिलं. माझ्या उतरत्या काळात मला त्यांनी खूप मदत केली. शिवसेनेला आणि बाळासाहेबांना मी कधीच विसरणार नाही.
तसेच नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु असून तुमच्या विरोधात ठाकूर यांचे आव्हान आहे असा प्रश्न विचारला असता त्यांनी मी दाऊद, छोटा राजन, लष्कर ए तोयबाचे अतिरेकी, बबलू श्री वास्तव यांच्या सारख्या गॅंगस्टर आणि दहशतवाद्यांशी दोन - दोन हात केलेत. त्यामुळे माझ्यासाठी ठाकूर मंडळी यापेक्षा मोठी नाही आहे. मला नालासोपारा मतदार संघातून उमेदवारी दिल्यास मी ती मोहीम फत्ते पाडेन असं ठाकूर यांना थेट आव्हान देखील प्रदीप शर्मा यांनी नाव न घेता दिलं आहे. मी निलंबित असताना मला शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी मदत केली. माझे निलंबन केले त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी धाडसाची धिंड या मथळ्याखाली अग्रलेख लिहला होता. अजूनही माझ्याकडे तो अग्रलेख आहे. ३६ वर्ष पोलीस खात्यात काम केले. आता सोडताना खूप दुःख होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.