शहापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शुक्रवारी शहापूर दौऱ्यावर होते. भगवान सांबरे रुग्णालय संचलित हेमंत सुपर कर्करोग स्पेशालिस्ट रुग्णालयाचं भूमिपूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदिवासी पाड्यावर जेवणाचा आस्वाद घेतला. दोऱ्याचा पाडा येथील रामचंद्र खोडके यांच्या घरी शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी जेवण केलं.
या कार्यक्रमासाठी सुरु असलेल्या आदिवासी नृत्याचं चित्रीकरण शरद पवार स्वत: आपल्या मोबाईल कॅमेऱ्यातून करत होते. आदिवासी कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी शरद पवार आदिवासी पाड्यावर जेवण करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. ठाणे-मुंबईपासून काहीच अंतरावर असलेल्या पाड्यात सोयी-सुविधांचा अभाव असल्याचं सांगत या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील जनतेला त्यांना परवडेल अशा खर्चात उपचार होतील असं शरद पवार म्हणाले.
तसेच शहापूर येथील जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मोफत मिळावं यासाठी शहापूरमध्ये केजी टू पीजी अभ्यासक्रम एकाच छताखाली विद्यासंकुलाची उभारणी करण्यात येत आहे. कर्करोगच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने यासाठी ग्रामीण भागात २०० खाटांचे स्पेशालिस्ट रुग्णालय उभारण्यात येत आहे. याचा फायदा रुग्णव्यवस्था बळकट करण्यासाठी केला जाईल असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.