लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बारमतीमध्ये विजय शिवतारे यांनी जी भुमिका घेतली आहे. त्यानंतर आता शिवसेना त्यांच्यावर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. शिवसेनेने कारवाई केल्यानंतर आम्ही त्यांचा समाचार घेऊ असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी शिवतारे यांना दिले आहे. याशिवाय शिवसेना हे चिन्ह गेल्यानंतर त्यांना त्यांचे अस्तित्व आणि जागा समजेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने सांगत होते की प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडी की आमच्या सोबत आहे. पण, प्रकाश आंबेडकर यांनी आता उमेदवार जाहीर केल्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तर आंबेडकर यांनी उमेदवार जाहीर केल्याने बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडी सोबत नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची यादी जाहीर करताच सांगलीच्या जागेवरून काँग्रेसमधून नाराजीचा सुरू उमटू लागला आहे. त्याचबरोबर मुंबईत संजय निरुपम यांच्यासह इतर पदाधिकारीही नाराज आहेत. यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीचा डाव फिस्कटल्याचेही ते म्हणाले. तर आव्हाड हे वारंवार टिका करीत असून पक्षनिष्ठ दाखवत आहेत, यावरुन परांजपे यांना छेडले असता, जो नाही झाला कार्यकर्त्यांचा, तो काय होणार पक्षाचा अशी टीका त्यांनी केली.