ठाणे : स्टेशन परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या भागातील विविध ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर वाहनतळ उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत मंजूर झालेला आहे. परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अद्यापही येथील जागा हस्तांतरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे पालिका या जागेच्या प्रतीक्षेत आहे.
नव्या प्रस्तावात कार्यालय आणि निवासी स्थानासाठी इतरत्र जागा देण्याची तयारीही पालिकेने दाखविली आहे. प्राधिकरणाने प्रस्तावाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. स्टेशन परिसरात नित्याचीच वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ती फोडण्यासाठी आणि स्टेशनच्या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गावदेवी मैदानाखाली भूमिगत पार्किंगचे काम सुरू केले आहे. तर गावदेवी मंडईच्या खालीदेखील पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
तसेच जांभळीनाका येथील महात्मा गांधी उद्यानाखालीदेखील भूमिगत पार्किंग प्रस्तावित केली आहे. याशिवाय गडकरी रंगायतन शेजारीदेखील आता पार्किंग प्लाझा उभारण्याचे निश्चित केले आहे. या वाहनतळामुळे मासुंदा तलाव, जांभळीनाका, टेंभीनाका परिसरातील रस्त्यावरील बेकायदा पार्किंगला लगाम बसणार असून या भागातील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचा, असा दावा महापालिकेने केला आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत हा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानंतर ३ डिसेंबर २०२० रोजी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी जागा हस्तांतरणासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविला. मात्र, त्यास प्राधिकरणाकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. यासंदर्भात भाजप आमदार संजय केळकर यांनी आयुक्त शर्मा यांची नुकतीच भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शासन स्तरावर या प्रस्तावासंदर्भात बैठक आयोजित होईल, तेव्हा या बैठकीला आपणास पाचारण करण्यात येईल,असे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती केळकर यांनी दिली.