डोंबिवली : दरवर्षी फोर्ब्स मासिक प्रसिद्ध करीत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत किमान दहा भारतीय अब्जाधीशांचा समावेश असतो. मात्र भारतामधील गोरगरीबांच्या समस्या सोडवण्यात या श्रीमंतांचे काडीमात्र योगदान नाही, अशी खंत नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी व्यक्त केली.डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता सभारंभात राज्यपाल आचार्य बोलत होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाहक संजय कुलकणी, संजय हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रसाद भिडे यांनी केले.राज्यपाल आचार्य म्हणाले की, श्रीमंताच्या यादीत भारतीय श्रीमंताची नावे दरवर्षी येतात. ज्यामुळे त्यांची नावे या यादीत झळकली तो देश, ती शाळा, त्यांचा मित्र परिवार, समाज यांच्यासाठी त्यांचे काहीच योगदान नसते. श्रीमंतांची जर इतकी अनास्था असेल तर देशाची आर्थिक प्रगती कशी होणार, असा सवाल त्यांनी केला. यादीतील दहा श्रीमंतांपैकी किमान ९ जण मुंबईत राहणारे असतात. मुंबईची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. त्यापैकी ७० लाख लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांचे जीवन नरकावस्थेपेक्षा बत्तर आहे. आदिवासींच्या जीवनापेक्षाही शहरी गरीबांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांना आदिवासींप्रमाणे मोकळा आणि स्वच्छ आॅक्सिजन मिळू शकत नाही. शहरी गरीबांचे व देशातील अन्य भागातील गरीबांचे राहणीमान उंचावण्यात या श्रीमंताचे योगदान नाही. ही शोकांतिका आहे. त्याचा विचार शिक्षण संस्थांनी केला पाहिजे.शिक्षण आणि व्यवसाय, उद्योगातील संधी यांचे प्रमाण आपल्याकडे व्यस्त आहे. परिणामी आपल्याकडे बेरोजगारीची समस्या जास्त आहे. बेरोजगार पदवीधर निर्माण करुन देश कमजोर झाला की बलशाली हा खरा प्रश्न आहे. जातीपातीच्या नावावर देशाला विघटीत न करता. भारत हा जन्मत: धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे सगळ््यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.विद्यार्थी घडवत असताना तो आत्मकेंद्रीत वृत्तीचा असता कामा नये. त्याच्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. तरच आपण खरे विद्यार्थी घडविले असे मला वाटते. शिक्षणाच्या यशाचे मापदंड चुकीचे असता कामा नये. आपल्याकडे विकासाचा रोडमॅप असला पाहिजे. रोजगार, शिक्षण आणि वीज या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या देशात ६८ टक्के युवकांचे प्रमाण आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिंक साधनसंपत्ती आहे. त्याचा उपयोग करुन भारत हा महासत्ता होऊ शकतो असे आचार्य यांनी नमूद केले.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, एक-एक व्यक्ती मिळून कुटुंब तयार होते. कुटुंब मिळून परिवार तयार होतो. परिवार मिळून देश तयार होतो. देशाच्या हिताचे काम करणे हे संघाचे व्रत आहे. विद्यार्थी घडवित असताना समाजमन विकसीत करण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण संस्थेने केले आहे.
‘फोर्ब्स’च्या यादीतील अब्जाधीशांचे सामाजिक योगदान शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:40 AM