ठाणे : सोशल मीडियाच्या प्रभावी वापरातून एका ७० वर्षीय वृद्धेला तिचे नातेवाईक मिळवून देण्यात राबोडी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या एका मेसेजमुळे रवींद्र भोईर (४५) या शहापूरच्या रहिवाशाला त्याची ७० वर्षीय वनिता भोईर ही आई अवघ्या २४ तासांमध्ये पुन्हा मिळाली. गुरुवारी राबोडी पोलिसांनी हरविलेल्या या आईला सुखरुपपणे तिच्या मुलाच्या स्वाधीन केले.
शहापूर येथे रवींद्र या मोठ्या मुलाकडे राहणारी वनिता ही स्मृतीभ्रंश झालेली वृद्ध महिला १२ जून रोजी भिवंडीतील कशेळी येथे आली होती. एका रिक्षा चालकाने तिला कापूरबावडी परिसरात सोडले होते. तिला पत्ता आणि कसलीच माहिती देता येत नसल्यामुळे त्याने तिला राबोडी पोलीस ठाण्यात आणून सोडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सूर्यवंशी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तिचा फोटो व्हॉटसअॅपच्या ठाण्यातील अनेक ग्रुपवर व्हायरल केला. ही माहिती या महिलेचा मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीवर असलेल्या रवींद्र या मुलाला मिळाली. त्याने गुरुवारी दुपारी ४ वा. च्या सुमारास राबोडी पोलिसांशी संपर्क साधला. त्याने सर्व ओळख पटवून दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी तिला या मुलाच्या स्वाधीन केले.वृद्धाश्रमाचा मार्ग बदलला...ही महिला पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिला कोणतीच माहिती व्यवस्थित सांगता येत नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. सर्व पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून तिच्या बेपत्ता होण्याची कोणी तक्रार केली आहे का, याचीही चाचपणी करण्यात आली. तसेच तिची माहिती मुंबई आणि ठाण्यातील पोलीस ठाण्यांना दिली.सोशल मीडियावरही ही माहिती व्हायरल करण्यात आली. १५ तास उलटूनही कोणीही पुढे न आल्याने अखेर पनवेल येथील जोसेफ यांच्या ‘कारुण्य’ वृद्धाश्रमात पोलीस तिला दाखल करण्यासाठी घेऊन जात होते. त्याचवेळी रवींद्रने राबोडी पोलिसांशी संपर्क साधल्याने तिचा वृद्धाश्रमाचा मार्ग बदलण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.मुलाकडून पैशांसाठी त्रासमोठा मुलगा रवींद्र याच्याकडे ही महिला वास्तव्याला असली तरी तिचा धाकटा मुलगा तिला पैशांसाठी दमदाटी करतो, असेही चोकशीमध्ये समोर आले. स्मृतीभ्रंश आणि मानसिक रुग्ण असल्यामुळे ती यापूर्वीही गुजरातमध्ये निघून गेली होती, असेही रवींद्रने पोलिसांना सांगितले.