- जितेंद्र कालेकरठाणे - पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोलीस आणि या सामाजिक कार्यकर्त्यामुळे एका संस्थेत आश्रय मिळाल्यामुळे गवारे यांच्या चेहºयावर हास्य फुलले.पूर्व द्रुतगती मार्गावरील नौपाड्यातील ‘शनया’ हॉलच्या समोर गवारे यांनी अनेक दिवसांपासून उघड्यावरच निवारा शोधला होता. त्यांच्याकडे दयाकर यांनी विचारपूस केली, तेव्हा त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्यामुळे त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. मुले किंवा पत्नीही नसल्याचे त्यांनी सांगितले. दयाकर यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव यांना ही माहिती दिली. त्यानुसार, सहा. पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन सेंटर या पुनर्वसन केंद्राला या निराश्रित फिरस्त्याची माहिती देऊन त्याला या केंद्रात आश्रय देण्याची केंद्राच्या व्यवस्थापकांना ८ मे रोजी पत्राद्वारे विनंती केली. गवारे हे बेघर आणि बेवारस असल्यामुळे त्यांना संरक्षण आणि काळजीची गरज असल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले. या पत्राची दखल घेऊन या केंद्राने गवारे यांना आपल्या पुनर्वसन केंद्रात आश्रय देण्याचे तत्काळ मान्य केले. त्यानुसार, ओऊळकर यांच्या पथकाने गवारे यांची रवानगी केली.‘‘गेल्या अनेक दिवसांपासून सेवारस्त्यावर हरिश्चंद्र गवारे या फिरस्त्याने उघड्यावरच आश्रय घेतला होता. आपल्याला कोणाचाच आश्रय नसल्यामुळे इच्छामरण मिळावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली होती. दयाकर यांनी त्याची काळजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी पदरमोड करून त्याला कर्जत येथील पुनर्वसन केंद्रात सोडवण्याची व्यवस्था केली.’’- चंद्रकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे
सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने दिला निराश्रिताला निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 6:31 AM