डोंबिवली : शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटकर (६८) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. पूर्वेतील शिव मंदिर रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.टिटवाळा येथे मुक्ता बालिकाश्रम संस्था उभी करण्यासाठी पाटकर यांनी परिश्रम घेतले होते. या संस्थेत वेगवेगळ्या भागांतून येणाऱ्या मुलींचे पुनर्वसन केले जाते. एक मुलगी म्हणजे एक संघर्ष, असे त्या म्हणत असत.२००० मध्ये स्थापन केलेल्या परिवर्तन संस्थेच्याही त्या अध्यक्षा होत्या. ही संस्था सुरुवातीला महिलांसाठी काम करत होती. जायंट्स क्लबने जागा दिल्याने त्यांनी २००५ पासून मुलींसाठी काम सुरु केले. अत्याचार झालेल्या मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्यासाठी त्यांनी जनजागृती केली.परिवर्तन महिला संस्थेतील १२ मुलींचे विवाहदेखील पाटकर यांनी करून दिले. घरातून पळून आलेल्या २९७ मुलींचे यशस्वीपणे संस्थेने पुनर्वसन केले. संस्थेत ४१ कार्यकर्ते आहेत. रेल्वे स्थानकात सापडलेल्या मुलींसाठी काम करण्याचा त्यांचा मानस होता. पाटकर यांनी भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम करताना पक्ष संघटना सक्षम केली.
सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:49 AM