मुंबई : गृहनिर्माण सोसायटी मोठी असो किंवा छोटी, तिचे व्यवस्थापन कसे केले जाते, सदस्यांना कोणत्या गोष्टी जास्तीच्या दिल्या जातात, महापालिकेच्या योजनांमध्ये तिचे योगदान कसे आहे, यावर त्या सोसायटीच्या कामांचे परीक्षण होत असते. तशाच प्रकारच्या निकषांवर ‘लोकमत बेस्ट सोसायटी पुरस्कारा’ची निवड केली जावी, असा सूर ‘लोकमत बेस्ट सोसायटी’ अवॉर्डच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उमटला.
‘लोकमत बेस्ट सोसायटी’ पुरस्कार या उपक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी ‘लोकमत’च्या कॉर्पोरेट कार्यालयात आयोजित चर्चासत्रात मुंबईतील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे प्रमुख रमेश प्रभू उपस्थित होते.
सोसायटी प्रमुखांना मार्गदर्शन करताना रमेश प्रभू म्हणाले की, सोसायट्यांमध्ये स्वच्छता, शौचालय व्यवस्था, मैदाने व आपापसातला एकोपा असणे गरजेचे आहे. आज अनेक सोसायट्यांच्या मैदानांचे रूपांतर पार्किंगमध्ये झाले आहे. काही सोसायट्यांमधील रहिवासी मुलांना मैदानांमध्ये खेळायला देत नाहीत़ लहान मुलांमधील मैदानी खेळांचे महत्त्व कमी होत चालले आहे. सोसायट्यांमध्ये कचऱ्याची विल्हेवाट योग्य रितीने लागायला हवी. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रकल्प राबवायला हवेत. अनेक सोसायट्यांमध्ये व्यवस्थापक नसतो. सोसायटीचे नुकसान होते. मलनिस्सारण वाहिनीची सफाई न झाल्याने मच्छरांची पैदास होते. सोसायटीचे फायर आॅडिट वेळच्या वेळी होणे गरजेचे आहे. काही ठिकीणी सुरक्षा रक्षक नसल्याने सोसायटीत येणाºया-जाणाऱ्यांची नोंद नसते. अनेक सोसायट्यांमधील घरधारक देखभाल खर्च वेळच्या वेळी देत नाहीत. यामुळेही सोसायटीचे नुकसान होते.
अंधेरीतील विजयनगरचे सदस्य वर्षा बापट, प्रसाद पेंडसे, वर्सोवा स्कायलर टॉवर्सचे सरचिटणीस एस.ए. गौली, सदस्य रमेश गौरे, वर्सोवा अंधेरी समर्थ कृपाचे सुनील सदेकर, लोअर परळ येथील रहेजा अॅटलांटिक्सच्य सदस्या सुजाता श्रीधर, कासा ग्रँड येथील हसुबेन शहा, मॅरेथॉन इराचे सदस्य जयंत बोरकर, ठाणे येथील रहेजाचे सरचिटणीस मुकुंद जोशी आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप बेंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. ठाणे डिस्ट्रिक हाउसिंग फेडरेशनचे सीताराम राणे व महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे यास मोलाचे सहकार्य लाभले.अंधेरीतील विजयनगर सोसायटीला एक उत्तम सोसायटी म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विजयनगर सोसायटीचे प्रसाद पेंडसे व वर्षा बापट यांनी त्यांच्या ६० वर्षे जुन्या सोसायटीत कशा प्रकारे उत्तम सोईसुविधा दिल्या जातात. परिसरातील समाजकार्यात कशा प्रकारे हातभार लावला जातो, याबद्दल मार्गदर्शन केले. आपली सोसायटी एक ब्रॅण्ड बनायला हवी, तरच इतर नागरिक आपला आदर्श घेतील, असे बापट यांनी सांगितले. एक चांगली सोसायटी कशी हवी, हे पाहवयाचे असल्यास विजयनगर सोसायटीला भेट द्या, असे पेंडसे म्हणाले.‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’मध्ये भाग घेण्यासाठी ज्या सोसायट्यांकडून अर्ज सादर केले जातील, ते अर्ज निवड समिती सदस्यांकडून शॉर्ट लिस्टेड केले जातील. त्यानंतर, निवड समितीचे सदस्य त्यापैकी ५० सोसायट्यांना भेट देतील. त्यांची पाहणी करतील. त्यातून ज्या सोसायट्या विजयी ठरतील, त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात गौरविण्यात येईल. ‘बेस्ट सोसायटी अवॉर्ड’साठी प्रीती अॅपलायन्स पार्टनर आहे, तर सारस्वत बँकेच्या सहकार्याने उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.