ठाणे - रेंटलमध्ये राहणाऱ्या बाधीतांनी दुसऱ्याना घरे भाड्याने दिल्याचे प्रकरण ताजे असतांनाच, आता या घरांमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या घरांच्या सुरक्षेसाठी आणि ही घरे चांगली राहतील या दृष्टीकोणातून सहा व्यवस्थापकांची नेमणुकही करण्यात आली होती. परंतु हे व्यवस्थापकही कुचकामी ठरत असल्याचे पालिकेनेच मान्य केले आहे. त्यामुळे आता येथील रहिवाशांनीच या घरांची काळजी घेण्यासाठी पालिकेने पावले उचलली असून रेंटलच्या घरांची सोसायटी (कमिटी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेस रेंटलच्या माध्यमातून आतापर्यत ३२६७ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. शहरातील रस्ते रु ंदीकरण तसेच इतर विकास प्रकल्पांमधील विस्थापितांना ही घरे रेंटल स्वरुपात देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यानुसार धोकादायक इमारतींमधील २२७२ बाधीतांना तर रस्ता रु ंदीकरणातील ९३४ बाधितांना आतापर्यत ही घरे वितरीत करण्यात आली आहे. असे असले तरी या घरांची अवस्था अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्र ारी सातत्याने पुढे येत आहेत. लिफ्ट बंद पडणे, पाण्याची वाणवा आणि अवघ्या चारच वर्षात या घरांची अवस्था अतिशय दयनीय झाल्याची माहिती समोर आली होती. त्यातही ज्या बाधीतांना ही घरे देण्यात आली होती. त्यांनी ही घरे दुसऱ्यानाच भाडेतत्वावर दिल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आतापर्यंत अशा प्रकारे घरे भाड्याने देणाऱ्या सुमारे ६५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. परंतु आजही येथील परिस्थिती जैसे थे अशीच आहे. त्यात आता काही दिवसांपूर्वी या ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याची बाब समोर आली आणि संबधींतावर गुन्हे दाखल झाले.दरम्यान, रेंटलच्या घरांसाठी सहा व्यवस्थापकांची नेमणूक करण्यात आली आहे. या व्यवस्थापकांना रेंटलची घरे चांगली राहितील, ती दुसऱ्याना भाड्याने दिली जाऊ नयेत, या बाबत काळजी घेण्याचे सांगण्यात आले होते. परंतु ही यंत्रणा देखील कुचकामी ठरल्याचे, पालिकेने मान्य केले आहे. सर्व प्रयत्न करुनही पालिकेला याबाबींवर अंकुश ठेवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता पालिकेने आणखी एक फंडा शोधून काढला आहे. जे या ठिकाणी राहतात, त्यांच्यातील काम करणाऱ्या मंडळींची एक सोसायटी तयार करण्याची शक्कल आता पालिकेने लढविली आहे. ही सोसायटीच इमारतीची देखरेख ठेवणार असून त्यांच्या माध्यमातून सध्या घडत असलेल्या प्रकारांना आळा बसेल असा विश्वास पालिकेला वाटत आहे.
रेंटलच्या घरांसाठी पालिका स्थापन करणार सोसायटी, व्यवस्थापकही ठरले कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:52 PM
रेंटलची घरे सुस्थितीत राहण्यासाठी पालिकेने विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले. परंतु त्यांचे हे सर्वच प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता शेवटचा उपाय म्हणून रेंटलमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनाच एकत्र करुन त्यांची कमिटी स्थापन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
ठळक मुद्देसहा व्यवस्थापकांची नेमणूक ठरली कुचकामीघर भाड्याने देणाऱ्या ६५ जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल