पंकज पाटील
बदलापूर : सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येतो याचा प्रत्यय बदलापूरमध्ये आला आहे. बदलापुरातून वाहणारी उल्हास नदी स्वच्छ करण्यासाठी एका युवतीने फेसबुकवर आवाहन करत नदी स्वच्छ करण्यासाठी एकत्रित येण्याची विनंती केली होती. या विनंतीला तरूणांनी चांगला प्रतिसाद दिला. दर रविवारी सकाळी या तरूणांच्यावतीने उल्हास नदी परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे.
बदलापूरमधील पूजा टांकसाळकर या तरूणीने आपल्या फेसबुकव अकाऊंटवरून उल्हास नदी स्वच्छतेसाठी आवाहन केले होते. दर रविवारी तरूणांनी एकत्रित येत बदलापूरातील उल्हास नदी आणि परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. फेसबुकवरील आवाहनानंतर पहिल्या रविवारी सत्कर्म आश्रमातील १५ विद्यार्थी आणि फेसबुकवरील संदेश पाहून १० तरूण एकत्रित आले. या सर्व तरूणांनी एकत्रितपणे बदलापूर चौपाटी परिसरातील सर्व कचरा, प्लास्टिक,दारूच्या बाटल्या उचलण्याचे काम हाती घेतले आहे. या परिसरातील सर्व घाणही काढण्याचे काम हाती घेतले आहे.
उल्हासनदीच्या किनाऱ्यावर अनेक मद्यपी रात्रीच्यावेळी दारू पिऊन बाटल्या फेकतात. या सर्व बाटल्या उचलून त्या परिसराची स्वच्छता केली जात आहे. अनेक नागरिक या भागात रात्रीच्यावेळी जेवणासाठी येतात. सर्व खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर उरलेले अन्न आणि तो कचरा तसाच टाकून निघून जातात. सततच्या प्रकारामुळे या भागात नियमित मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. त्यामुळे नदीच्या प्रदूषणातही वाढ होत आहे. उल्हासनदीच्या तीरावर तयार केलेल्या चौपाटीच्या स्वच्छतेसोबत नदी पात्रात जाणारा कचरा रोखण्याचा प्रयत्न या तरूणांनी सुरू केला आहे. पहिल्या दिवशी मोजकेच तरूण आले असले तरी या संदर्भात आणखी माहिती घेतल्यावर दुसऱ्या रविवारी तब्बल ४० तरूण या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एकत्रित आले.तरूणांनी दिलेली साथ यामुळे परिसरातील सर्व कचरा बाहेर काढण्यास मदत होते. पहिल्या दिवशी या तरूणांना परिसरात ४२ दारूच्या बाटल्या आणि दुसºया रविवारी तब्बल ५५ दारूच्या बाटल्या मिळाल्या. त्यावरून या परिसरात नागरिकांसोबत तळीरामांचाही वावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न तरूण करत आहे. कचरा गोळा करताना मिळालेल्या दारूच्या बाटल्या विकून जी रक्कम जमा होणार आहे त्यात आणखी भर टाकून भिंती रंगविण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी तरूणांची फळी मदत करेल असा विश्वास पूजा हिने व्यक्त केला.तरूणांना जोडण्याचा अधिक प्रयत्नस्वच्छतेची ही मोहीम अविरतपणे सुरू राहणार असून जास्तीतजास्त तरूण या उपक्रमाशी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे.राजकीय हस्तक्षेप न ठेवता बदलापूरमधील तरूणांना सामाजिक भान लक्षात घेऊन संघटित करण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या निमित्ताने केले जात आहे.या अनोख्या उपक्रमात जास्तीतजास्त तरूणांनी एकत्रित येण्याचे आवाहन टांकसाळकर यांनी केले आहे.