प्रज्ञा म्हात्रे,ठाणे : सार्वजनिक जीवनात बदल घडत असताना लोकाभिमुख स्वयंसेवी संस्था ही काळाची गरज आहे. जुन्या, अनुभवी संस्थांनी आपल्या कामाचे वर्तुळ विस्तारत नेले पाहिजे. समाजाने सामाजिक संस्थांच्या कामात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे; असे प्रतिपादन टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय किर्तीचे मनुष्यबळ विकास तज्ज्ञ, विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक सदस्य शरद गांगल यांनी केले.
ठाणे नौपाडा येथील ब्राह्मण सेवा संघाच्या ९१ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अतिथी म्हणून गांगल बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण, विश्वस्त संजीव ब्रम्हे, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त संस्थेचे अमृत महोत्सवी सभासद, विशेष नैपुण्य प्राप्त सभासद आणि विद्यार्थी यांचा सत्कार शरद गांगल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना गांगल म्हणाले, ९१ वर्षे सातत्याने काम करणे आणि बदलांना सामोरे जाऊन टिकणे ही मोठी उपलब्धी आहे.
संस्था स्थापनेची उद्दिष्ट सांभाळून संस्था व्यापक करणे हे कठीण काम असते. मात्र, निष्ठावान, समर्पित कार्यकर्ता संच असले तर संस्था वृद्धिंगत होतात असे सांगून शरद गांगल यांनी ब्राह्मण सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले. ब्राह्मण सेवा संघासारख्या संस्था उपयुक्त आहेत असे ते म्हणाले. ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम आगवण यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला संस्थेचे सभासद, हितचिंतक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.