लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : प्रजनन अवयव सोडल्यास स्त्री व पुरुषात काहीही नैसर्गिक भेद नाहीत. तरीदेखील महिलांबरोबर भेदाभेद केला जातो. शिक्षण, जेवण, पगार, घरातील निर्णय प्रक्रिया, याबाबत भेदाभेद आजही अस्तित्वात आहे. घर दोघांचे, मुले दोघांची मग जास्त जबाबदारी स्त्रीकडेच का जाते? असे प्रश्न उपस्थित करत, स्त्री-पुरुष समानता म्हणजे दोघांना समान संधी व समान सन्मान असणे आवश्यक आहे. सर्वच क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केले असल्याने, समाजाने स्त्री-पुरुष समानता आचरणात आणावी, असे मत आंतरराष्ट्रीय जीवन प्रशिक्षक उल्का शुक्ल यांनी मांडले.
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला समता विचार प्रसारक संस्थेने घेतलेल्या युवा मेळाव्यात ‘स्त्री-पुरुष समानता, समाजाला देईल सुदृढता’ या विषयावर शुक्ल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया होते.
स्त्रिया-पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात यशस्वीपणे नाव कमवत आहेत. शारीरिक, मानसिक क्षमता असो किंवा शैक्षणिक, व्यवसाय, राजकीय आणि प्रशासकीय आदी जवळजवळ सर्वच क्षेत्रात महिलांनीही कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यामुळे स्त्रिया एक माणूस म्हणून पुरुषांपेक्षा कुठेही कमी नाही, असेही शुक्ल यांनी सांगितले.
उपस्थित मुली व मुलांचे गट बनवून, जन्माला आल्यापासून २० वर्षे वयापर्यंत विविध टप्प्यांवर मुली-मुलांची वाढ होत असताना त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थिती, अनुकरण आणि स्वभाव व वागणुकीत होणारे बदल या बाबतीत त्यांनी सर्वांना बोलते केले. बाळाच्या पालन पोषणाची प्रक्रिया घडताना कुटुंबात मुलगी म्हणून दुय्यम वागणूक मिळते का? मूल हवे की नको? आदीबाबत कुटुंबात चर्चा होते का? स्त्रीचा स्वतःच्या शरीरावर हक्क आहे का? गर्भधारणा करणे किंवा गर्भपात करणे हा स्त्रीचा हक्क आहे का? आदी प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेची एकलव्य कार्यकर्ता अक्षता दंडवते यांनी केले. पाहुण्यांची ओळख संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी तर, आभार ओम गायकवाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जोशी, सचिव हर्षलता कदम, सहसचिव अनुजा लोहार आणि सहखजिनदार अजय भोसले आदी उपस्थित होते.
‘विचार करूनच व्यक्त व्हा’
शेवटी शुक्ल म्हणाल्या की, ‘आजच्या एकूण परिस्थितीबाबत निरीक्षणे करा, समजून घ्या आणि विचार करा, मग व्यक्त व्हा. व्यक्त होण्याची अनेक माध्यमे आहेत. त्याचा उपयोग करा.’
---------------------